-->
करमाळाराजकियराज्य

करमाळ्याच्या शिष्टमंडळाने तालुक्यातील ‘या’ प्रमुख प्रश्नांसाठी घेतली मंत्री तानाजी सावंत यांची भेट 

करमाळा तालुक्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार- नूतन कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांचे आश्वासन

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा तालुक्यातील रखडलेले सर्व प्रश्न मार्गी लागण्यासाठी मी कटिबद्ध असून विशेषता रिटेवाडी उपसा सिंचन योजना, सरफडोह येथील जमिनीचा प्रश्न, मांगी तलावात कायमस्वरूपी कुकडीचे पाणी आणणे या महत्त्वाच्या प्रश्नांसह आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला नवसंजीवनी प्राप्त करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत नूतन कॅबिनेट मंत्री तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केले.

 

 

करमाळा तालुक्यातील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज पुणे येथील मंत्री तानाजी सावंत यांचे कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी करमाळा तालुक्यातील प्रश्नां संदर्भात आढावा बैठक घेतली. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी करमाळा तालुक्यातील विविध प्रश्नांची मांडणी करून निवेदने दिली. यावेळी शिवसेनेचे नेते प्रा. शिवाजीराव सावंत, भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक किरण तात्या सावंत, शिवसेना शहरप्रमुख संजय आप्पा शीलवंत, वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे तालुकाप्रमुख दीपक पाटणे, ॲड. स्वप्निल अवधूत, ज्येष्ठ पत्रकार नासिर भाई कबीर, कात्रज येथील युवा उद्योजक गणेश भाऊ वनशिव, हिवरवाडीचे शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, आदिनाथ कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे आदी जण उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना मंत्री तानाजीराव सावंत म्हणाले की, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील रखडलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. करमाळा तालुक्यातील रखडलेल्या सर्व योजनांची माहिती गोळा करून लवकरच मंत्रालयात स्वतंत्र बैठक लावण्यात येणार असून या सर्व कामातील अडथळा तात्काळ पार करून करमाळा तालुका विकासाच्या वाटेवर घेऊन जाऊ असा विश्वास व्यक्त केला.

 

यावेळी महेश चिवटे यांनी आपल्या प्रास्ताविकातून तालुक्यातील अनेक अडचणी मांडल्या. त्यावर लवकरच करमाळा येथे ही एक बैठक घेण्याचे तसेच करमाळा तालुक्यात शिवसैनिकांचा भव्य मेळावा घेण्याचे आश्वासन मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी दिले.

 

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल करमाळा तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी हार, शाल, श्रीफळ व श्री कमलाभवानी मातेची प्रतिमा भेट देऊन प्रा. तानाजीराव सावंत यांचा सत्कार केला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close