-->
आरोग्यकरमाळाकृषी विषयक

करमाळा येथील ‘रानभाज्या महोत्सव’ उत्साहात संपन्न; महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

प्रतिनिधी (कृषी)/ मनोज बोबडे

 

 

महाराष्ट्र शासन कृषि विभाग व तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) करमाळा यांचे शेतशिवारातील नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या/रानफळे यांचे महत्व व आरोग्य विषयक माहिती सर्वसामान्य नागरीकांना व्हावी. तसेच शेतकऱ्यांना सदर रानभाज्या विक्रीतून काही प्रमाणात आर्थिक फायदा मिळावा या हेतूने जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि. ११ ऑगस्ट रोजी पंचायत समिती सभागृह करमाळा येथे करण्यात आले होते. सदर रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन करमाळ्याचे मा. तहसिलदार श्री. समीर माने साहेब, गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत, निवासी नायब तहसीलदार श्री. सुभाष बदे व तालुका कृषी अधिकारी श्री. संजय वाकडे साहेब यांचे हस्ते करण्यात आले.

 

 

यावेळी तालुक्यातील शेतकरी तसेच महिला बचत गटातील महिलांनी आपल्या शेतामध्ये पिकवलेल्या रानभाज्या विक्रीस आणल्या होत्या. मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. आपल्या आहारात भाजी म्हणून खोड, पाने, फळे, बिया, कंद, मुळे, फुले यांचा वापर केला जातो. भारतात भाजीच्या सुमारे ५५ प्रजाती आहेत. अलीकडील काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी आज अमर्यादित प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा वापर शेतकरी करीत आहेत. यामुळे भाजी उत्पादनात, भाज्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण त्यांची नैसर्गिक चव, प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. असं म्हणतात आपल्या मातीत जे पिकतं ते आपण खावे.

 

भाज्यांचे पावसाळ्यात येण्याचे प्रमाण जरी अधिक असले तरी वर्षभर ऋतुमानानुसार या भाज्या येत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आहाराचा मुख्य प्रश्न सुटतो; शिवाय कुपोषणावर देखील या रानभाज्या फायदेशीर आहेत. वनस्पती विज्ञानाचा अभ्यास असे दाखवतो की, पावसाळ्याच्या सुरुवातीस असलेला अन्नधान्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी, पौष्टीक अन्न मिळावे म्हणून निर्सगाने मुद्दामहून निर्माण केलेल्या भाज्यांचा वापर शेतकरी करीत असतात. इतर भाज्यांप्रमाणे लागवड शक्य नसल्याने पावसाळ्याच्या मोसमातच या भाज्या उपलब्ध होतात. रानभाज्या मध्ये बांबू कोंब, चिघळ, सराटा, हादगा, पिंपळ, उंबर, कडवंची, भुई आवळा, पाथरी, तांदूळसा, कुरडू, माट, हादगा इ. यामध्ये जवळपास २७ रानभाज्या प्रदर्शनामध्ये प्रदर्शित करण्यात आल्या.

 

 

या कार्यक्रमास श्री. देवराव चव्हाण कृषी अधिकारी, श्री. योगेश जगताप (उमेद), श्री. अजय बागल (आत्मा) श्री. पोळके साहेब, श्री. राऊत साहेब, श्री. उमाकांत जाधव साहेब, श्री. गायकवाड साहेब, श्री. सत्यम झिंजाडे श्री. मनोज बोबडे (PMFME), मंगेश भांडवलकर, श्री. राहूल गोरवे, श्री. दिपक काकडे उपस्थित होते. करमाळा शहर व परीसरातील नागरीकांनी शेतकरी व महिला बचत गटातील महिलांनी विक्रीस आणलेल्या रानभाज्यांची खरेदी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close