करमाळा पंचायत समिती येथे कृषीदिन कार्यक्रम व कृषि संजिवनी सप्ताह समारोप कार्यक्रम
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


आज दि.१ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) करमाळा तसेच पंचायत समिती कृषि विभाग यांचे संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने कृषीदिन कार्यक्रम व कृषि संजीवनी सप्ताह समारोप कार्यक्रम पंचायत समिती सभागृह करमाळा येथे आयोजीत करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून उपविभागीय कृषि अधिकारी कुर्डूवाडी श्री. रविंद्र कांबळे साहेब उपस्थित होते.
यावेळी कृषि विभागाच्या वतीने शेती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी असणाऱ्या प्रगतशील शेतकरी तसेच सन २०२१-२२ मध्ये तालुकास्तरीय पिकस्पर्धामध्ये विजेते ठरलेले शेतकरी यांना मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच कृषि विभागातील उत्कृष्ठ कामगिरी असलेल्या कर्मचाऱ्यांनाही प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.
सदर कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी करमाळा श्री. संजय वाकडे, मंडळ कृषि अधिकारी केत्तूर श्री. देविदास चौधरी, कृषि अधिकारी पंचायत समिती श्री. शंकर मिरगणे व देवा सारंगकर, विस्तार अधिकारी श्री. म्हेत्रे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. अजयकुमार बागल व सत्यम झिंजाडे, उद्यानपंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री. किरण डोके, सेंद्रिय शेतीमध्ये चांगले काम करणारे श्री. संदिप यादव, आवळा पिकामध्ये उच्चांकी उत्पादन घेतलेले श्री. बाळासाहेब काळे, महिला शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून उत्कृष्ठ शेती करत असलेल्या प्रगतशील महिला शेतकरी श्रीमती. हर्षाली नाईकनवरे, खत विक्रेते असोसिएशन चे अध्यक्ष श्री. महेश चिवटे, पाणी फाऊंडेशनचे श्री. प्रतिक गुरव व अशिष लाड, उमेद अभियानचे तालुका अभियान व्यवस्थापक श्री. योगेश जगताप, तसेच श्री मनोज म.बोबडे, जिल्हा समन्वयक तथा जिल्हा संसाधन व्यक्ती (PMFME), रिसोर्स फार्मर बँकेतील प्रगतशील शेतकरी, कृषि विभागाचे कर्मचारी व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि सहाय्यक श्री. उमाकांत जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. अजयकुमार बागल यांनी केले.



