
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्याचा सर्वांगीण आणि गतिमान विकास साधण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आगामी २०२६ मधील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही अधिकृत घोषणा माजी आमदार संजयमामा शिंदे आणि भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. रश्मी बागल यांनी गुरुवारी दि. २३ जानेवारी रोजी करमाळा येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
बायपास रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत बोलताना नेत्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहमतीने ही युती निश्चित करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्रित प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच भाजपकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह स्टार प्रचारकांच्या सभांचाही कार्यक्रम होणार असल्याची माहिती देण्यात आली.
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागाचा वेगाने विकास करणे, कार्यकर्त्यांना प्रभावीपणे काम करण्याची संधी देणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे, या उद्देशाने ही युती करण्यात आल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. ही आघाडी केवळ राजकीय नसून, विकासकेंद्री असल्याचा ठाम दावा यावेळी करण्यात आला.
भाजपचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी सांगितले की, “पायाभूत सुविधा, शेती विकास, रोजगारनिर्मिती आणि सर्वसामान्य नागरिकांचे कल्याण या मुद्द्यांवर ही युती काम करणार आहे. विकासाभिमुख नेतृत्वाला जनता निश्चितच साथ देईल.”
या संयुक्त पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत आवताडे, माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव माळी, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, चिखलठाणचे माजी सरपंच चंद्रकांत सरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांच्यासह भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“ही युती विकासाच्या व्यापक दृष्टिकोनातून करण्यात आली आहे. करमाळा तालुक्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप–राष्ट्रवादीची ही युती सक्षम आहे. जनता निश्चितच या युतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करेल.”
– रश्मीदिदी बागल, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा.
आगामी २०२६ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही युती करमाळा तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरणार असून, विकासाच्या मुद्द्यावर आधारित ही आघाडी मतदारांचे लक्ष वेधून घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



