-->
करमाळाकृषी विषयकराजकियराज्य

पाणी परिषद ही शेतकऱ्यांची तळमळ नसून, आ.शिंदे विरुद्धची राजकीय मळमळ होती; ॲड. विघ्ने यांचा तळेकर यांना मार्मिक टोला

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर यांनी केलेल्या टिकेला आमदार शिंदे गटाचे ॲड. अजित विघ्ने मार्मिक शब्दात उत्तर देताना म्हणाले की, लाकडी निंबोडी योजनेबद्दल एका वृत्तपत्राच्या बातमीमध्ये माझी प्रतिक्रिया घेतलेली होती. तशीच प्रतिक्रिया पाटील गटाचे प्रवक्ते, माझे जुने सहकारी मित्र सन्माननीय सुनिल तळेकर यांचीही घेतलेली आहे. सदरचे बातमीमधे मी जी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यानुसार लाकडी- निंबोडी ही प्रस्तावित योजना जुनीच असुन सदर योजनेकरीता आजपर्यंत निधी प्राप्त झालेला नव्हता. सन २००० पासुन ते २०२२ पर्यंत चे जलसंपदा विभागाकडील पाणीवापराचा ताळेबंद पहाता त्यामधे सदरची योजना प्रस्तावित आहे हे दाखविले गेलेले आहे. त्यामुळे ही योजना जुनी असल्यामुळे त्याचे खापर विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचेवर फोडता येणार नाही, हे मी स्पष्ट केलेले होते. मात्र पाटील गटाकडुन झालेल्या पाणी परिषदेतुन फक्त आमदार शिंदे यांना टार्गेट करून पाणी परिषद भरकटली होती. कारण, आपल्या सुपिक डोक्यातली पाणी परिषद ही शेतकऱ्यांची तळमळ होती की, आमदार संजयमामा शिंदे यांचे विरुद्धची राजकीय मळमळ होती हे सर्वांनीच पाहीले आहे.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, माजी आ. नारायण पाटील यांच्या पाणी परिषद कार्यक्रमातुन लाकडी निंबोडी योजनेला पहिल्या कार्यक्रमात विरोध दर्शविला. मात्र, दुसऱ्याच कार्यक्रमापासुन लाकडी निंबोडी योजनेवर अवाक्षर ही काढण्यात आले नाही. पुन्हा प्रवक्त्याच्या डोक्यातली परिषद कृष्णा भिमा स्थिरिकरणाकडे वळली. वस्तुतः प्रवक्ते तळेकर यांच्या डोक्यातुन पाणी परिषद, जलधारा, अभिषेक यासारखे दर्जेदार शब्द ऐकायला मिळाले. परंतु त्यांनी वस्तुस्थिती न मांडता फक्त विद्यमान आमदार यांचेवर टिका टिप्पणी करण्यात धन्यता मानली.

 

तळेकर सरांचे सर्व काही बरं असून मानधन आणि पाठीशी भारत हायस्कुल आहे. गलेलठ्ठ पगार असल्यामुळे पोटा पाण्याचा प्रश्न नाही, कोटापेक्षाही पोटाचा प्रश्न खुप महत्वाचा असतो याची जाणिव आहे. ब्रिटीश लोक कोट सारखे बदलतात हे तुमच्याकडुन च समजले. पोटासाठी आणि सर्वसामान्यांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठीच मी वकीलीचा कोट परिधान केला आहे. आपण आदरणीय स्व. देवकर वकील, लुनावत वकील, हिरडे वकील व अन्य ज्येष्ठ विधिज्ञाची आदरपुर्वक नावे घेतली त्याबद्दल धन्यवाद.परंतु आमचे कोट हे ब्रिटीशांचे कोट नाहीत हे पण समजुन घ्यावे.

 

वस्तुतः जलसंपदा विभागाने २२ एप्रिल २०२१ रोजी जे पत्र काढले होते. त्यानुसार उजनी जलाशयाचे उर्ध्व बाजुस बिगर सिंचन पाणी वापरातुन उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातुन उचलुन शेटफळ गढे येथे सोडुन खडकवासला प्रकल्पाचे स्थिरिकरण करणे अशी योजना प्रस्तावित करण्यात येत होती. ज्या योजनेला आपण सर्वांनी विरोध दर्शविला होता ती योजना रद्द करण्यात आलेली आहे. वस्तुतः आपण म्हणता असे आपण सर्वांनी सर्वपक्षिय बैठक घेऊन सदर पत्राची होळी करणेचे नियोजन केलेले होते. परंतु तत्पुर्वीच जलसंपदा मंत्री माननीय जयंत पाटील साहेब यांनी योजना रद्द केलेचे पत्र आमदार संजयमामा शिंदे यांचे उपस्थितीत दिले. त्यानंतर पत्राची होळी करण्याचा कार्यक्रम आपण रद्द केला व सदरचा कार्यक्रम रद्द झाल्याचे सर्वांना कळविण्यात आलेले होते. त्यामुळे माझे, तुमचे किंवा इतर कोणाचेही हात भाजले नाहीत. परंतु जुन्या आणि नव्या योजने बाबत तफावत करून चुकीचे सांगुन आपण जी दिशाभुल करणेची शेकोटी पेटवत आहात ते योग्य नसून याच पेटलेल्या शेकोटी मध्ये आपले हात भाजू नयेत याची काळजी घ्यावी.

 

तुम्ही सांगितल्याप्रमाणे ब्रिटिश अधिकारी सारखा कोट बदलतात तसे आजपर्यंत गट तट कोणी बदलले नाहीत. नेत्यांपासुन कार्यकर्त्यांची सारखीच अवस्था आहे. करमाळा तालुक्यात आदरणीय आबांचा प्रवास सुद्धा जगताप गट- जनसुराज्य- राष्ट्रवादी- शिवसेना- अपक्ष – भाजपा असाच झाला आहे. या भुमिका त्यांना का बदलाव्या लागतात.? ते तुम्हीच त्यांना विचारा ते सांगतील तुम्हाला.!तुम्हाला आणि आम्हाला करमाळा तालुक्यातील अनेक विकास कामात अग्रेसर राहुन काम करायचे आहे. राजकारणात कधी वेगवेगळे आणि कधी एकत्र येऊन भुमिका घ्यायच्या असतात. उजनीतुन २१ टिएमसी पाणी जमिनीखालून बोगद्याव्दारे जाणार आहे आणि त्याचे काम चालु आहे. निरा नदीतले पाणी भिमा नदीत येणार आहे त्याचे काम इंदापुर येथे चालु आहे. त्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. कारण निरेतुन येणारे पुराचे पाणी २१ टिएमसी मराठवाडा साठी दयायचे आहे. त्यामुळे भविष्यकालीन योजनांचा विचार होवुन उजनी धरण पाणी वाटप नियोजन केले जाईल. याकरिता आपल्या तालुक्याचे संपुर्ण क्षेत्र हिरवेगार करण्यासाठी कुकडी प्रकल्प, दहीगाव योजना यांसह अनेक नविन योजना आमदार संजयमामा शिंदे यांनी आखलेल्या असुन त्याचे रिझल्ट थोड्याच दिवसात दिसतील. तालुक्यात गेल्या पाच वर्षात आमदार नारायण आबांनी केलेली विकासकामे आम्ही मुळीच नाकारत नाही. परंतु, विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचेकडुन होत असलेली विकासाची कामे देखिल आपण मान्य केली पाहिजेत.

 

भविष्यकालीन विकासकामांसाठी आमदार शिंदे यांनी केलेले नियोजन बाबत चर्चा होवुन आणि त्यांचे कार्यशैली वर प्रभावित होवुन मी आणि असंख्य कार्यकर्त्यानी कोट बदलले आहेत. मीच नाही तर प्राचार्य अनिल पाटील सर यांनी देखिल कोट बदलला आहे. तो सर तुम्ही देखिल बदलला असता पण तुम्ही बांधलेले आहात याची जाणिव आम्हाला आहे. आणि तुम्ही घेतलेली परिषद किंवा जलधारा अभिषेक कार्यक्रम आम्हाला कधीच झोंबणारा नसेल. मात्र, आपण अभ्यासपुर्ण बोलावे एवढीच माफक अपेक्षा आहे. असेही ते शेवटी म्हणाले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close