-->
करमाळाकृषी विषयकसामाजिक

लाकडी निंबोळी योजनेमार्फत उजनीचे पाणी पळविण्याचा घाट; प्रकल्पाला स्थगिती देण्याची शिवसेनेची मागणी

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

लाकडी निंबोळी या प्रकल्पाच्या माध्यमातून उजनीतून बेकायदेशीररित्या करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय करून पाच टीएमसी पाणी पुणे जिल्ह्याला पळविण्याचा घाट उपमुख्यमंत्री अजित पवार, पालक मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी घातला असून या प्रकल्पाला तात्काळ स्थगिती द्यावी. अशी मागणी करमाळा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, युवा सेनेचे शहरप्रमुख विशाल गायकवाड, देवळालीचे शिवसेनेचे युवा नेते राहुल कानगुडे, माजी नगरसेवक अनिल पाटील, अजिनाथ इरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, उजनी धरणावरून संपूर्ण सोलापूर जिल्हा व मराठवाड्याला पाणी पुरवठा केला जातो. सध्या उपलब्ध असलेल्या पाण्यात सोलापूर जिल्ह्याची तहान भागत नाही. उजनी धरणात प्रचंड गाळ साचल्यामुळे त्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. करमाळा तालुक्यातील उजनी धरणावरील अनेक पाणीपुरवठा सिंचन योजना प्रलंबित आहेत. या उजनी धरणासाठी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. करमाळ्यातील शेतकऱ्यांची घरेदारे, शेती धरणाच्या पाण्यात गेली. मात्र अद्यापही करमाळा तालुक्यातील ७५ टक्के क्षेत्राला पाणी मिळत नाही.

सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावे पाण्यासाठी तळमळत असताना, उलट दिशेने, धरणाच्या प्रस्तावात नसताना पुणे जिल्ह्यासाठी या धरणातील पाणी पळवणे म्हणजे धरणग्रस्तांच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. राजकीय दबावापोटी हा निर्णय तात्काळ घेऊन या योजनेला निधीची तरतूद करण्यात आली आहे. दुसरीकडे मात्र करमाळा तालुक्यातील अनेक योजनांची कामे निधीअभावी रखडली आहेत. या सर्व बाबींचा विचार करून करमाळा तालुक्यातील सर्व पाणीपुरवठा योजनांचे पूर्तता करून तालुक्याचे हक्काचे सर्व पाणी करमाळा तालुक्याला देऊन मग इतर नवीन योजनांना मान्यता द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

या विषयी आपण तात्काळ मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना अहवाल घेऊन योग्य ती कारवाई करू असे आश्वासन खासदार अनिल देसाई यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close