-->
सामाजिक

२१ व्या शतकात असलेले स्त्रियांचे समाजातील स्थान; विचार करायला लावणारा लेख नक्की वाचा

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

एकविसाव्या शतकामध्ये स्त्री पुरुष समानता होणार, स्त्री सक्षम होणार. २०२२ साल उजाडले पण स्त्रीयांविषयी पुरुषांचे मानसिक विचार काही बदलले नाहीत. १८४८ साली पुण्यात, मुलींची पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी चालू करून स्रियांना जी दूरदृष्टी दाखवली त्याला खरंच आज तोड नाही. जाचक धार्मिक बंधने आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या जात्यात रोज भरडल्या जाणार्‍या लाखो स्त्रियांसाठी ‘शिक्षण’ एक अपूर्व असा आत्मभानाचा प्रकाश घेऊन आले. शिक्षण घेण्यासाठीचा स्त्रियांचा लढा हा कधीच सोपा नव्हता आणि आजही नाही. निसर्गाने दिलेल्या जबाबदाऱ्या तर तिला पार पाडाव्याच लागतात. त्याच बरोबर तिच्यावर लादल्या गेलेल्या ही जबाबदाऱ्या ती पार पाडतचे आहे.

स्त्रियांच्या बाबतीत आज २१ व्या शतकात फक्त चूल आणि मूल अशी परिस्थिती राहिलेली नाहीये. स्त्रियांनी अनेक छोटे-छोटे उद्योग घरच्या घरी करून त्यातून सुध्दा मानाचे स्थान मिळवले आहे. आजच्या २१ व्या शतकात मुली किंवा स्त्रिया या स्वतंत्र विचारांच्या जरी असल्या तरी त्यांनी त्यांची मर्यादा ओळखून वागायला हवे असे का म्हटले जाते? स्त्री बाबत विनयभंग, बलात्कार अशा समस्या झाल्या तर पहिला दोष हा स्त्रीलाच का दिला जातो ? स्त्रिया या सर्व कुटूंबाची जबाबदारी स्विकारून नोकरी करतात, त्यावेळी घरच्यांनीसुध्दा पाठिंबा दिल्यामुळे त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वताला खंबीरपणे सिध्द करू शकतात. शिक्षणामुळे त्यांची प्रगती खूप मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पहायला मिळते. या सर्व गोष्टी जरी ख-या असल्या तरी स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रोज सकाळी लवकर उठून घरच्यांसाठी जेवण करून मुलांचे सर्व नीट करून एखादी स्त्रीही जेव्हा घरातून बाहेर पडते तेव्हा ती सुरक्षित घरी येऊ शकते का? याचा सर्वानी विचार करावा. आजकाल स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण होताना आपल्याला दिसतात. स्त्री ही मुळातच सहनशील असते म्हणून तिने होणा-या अत्याचारांना सहन करणे हे योग्य नाहीये ना?

महिलांना शिक्षणामुळे आत्मविश्वास आला. त्या सक्षम झाल्या आहेत, पण त्यांचे सक्षमीकरण पचवू शकणारे पुरुष आपला समाज तयार करू शकलेला नाही. राजकीय पौगंडावस्थेमध्ये स्रिया वाहून जाताना दिसत आहेत. तर दुसरीकडे स्त्रियांची सामाजिक सुरक्षितता प्रचंड धोक्यात आलेली आहे. लहान मुलींवर लैंगिक अत्याचार वाढले आहेत. पुरुषसत्ताक मानसिकतेमूळे प्रेमात, नात्यात नकार न पचवू शकणारे पुरुष तसेच एकतर्फी प्रेम करणारे पुरुष ऍसिड हल्ला, खून, बलात्कार, चारित्र्यहीन करणारे पुरुष दिवसेंदिवस वाढतच आहेत. पुरुषसत्ताक अवस्थेमध्ये आजही तिला तिच्या लैंगिकतेविषयी अबोल राहावे लागत आहे. प्रत्येक बाबतीत स्त्री वर बंधन घातली जातात. धर्माच्या नावाने रूढी व परंपरा मध्ये गुंतवले जाते. स्त्रीचे स्वताचे स्वतंत्र्य व्यवस्था हिरावून घेते. प्रत्येकाला स्वतंत्र्य असते मग स्त्री स्वतंत्र्याच्या बाबतीत समाज इतका उदासीन का ? प्रत्येक बंधनात स्त्रीला बांधले जाते. स्वताच्या इच्छेने, विचाराने जगण्याचे स्वातंत्र्य आपण मुलीचा जन्म झाल्यापासून हिरावून घेतो.

आज स्त्रियांवर खूप अत्याचार होताना दिसतात. काही वेळेला तर स्त्रियांना खुप घाणेरडे असे अश्लील विनाेदांना सामोरे जावे लागते, तसेच अतिशय वाईट कमेंन्ट्सना सामोरे जावे लागते. स्त्रियांच्या सुरक्षेचा विचार करताना आणखी एका महत्तवाच्या समस्येला सामोरे जावे लागते ते म्हणजे मोठ्या मुली किंवा स्त्रियांना जसे बलात्काराचा सामना करावा लागतो तसेच कितीतरी नि:श्पाप जीवांना सुध्दा म्हणजेच २/३ वर्षाच्या मुलींना सुध्दा ह्या बलात्काराचा सामना करावा लागतो. या सर्वामध्ये त्यांची काही चूक नसते तरी त्यांना या त्रासाला सामोरे जावे लागते. ज्यावेळी अशा सर्व गोष्टी घडतात तेव्हा असे कृत्य करताना त्या व्यक्तींना कसलीही लाज का वाटत नाही असा प्रश्न निर्माण होतो? या सर्व गोष्टी करताना काही वेळेला नातेवाईक ही या सर्वाला कारणीभूत असतात. या सर्व गोष्टीमध्ये लोकांची बघ्याची भूमिका असते. कोणीही कसलीही पर्वा करत नाही. या सर्वापासून स्त्रियांची सुरक्षितता करणे हे सर्वस्वी त्या स्त्रीचे जसे कर्तव्य आहे तसेच इतरांचेही कर्तव्य आहे. सर्वानीच स्त्रियांना मानाने, आदराने वागवावे अशी विनंती. स्त्रीही अनेक बाबतीत जशी स्वतंत्र विचारांची असते तसेच इतरांनीही तिला समजून घ्यावे. आजच्या काळात स्त्रियांनी खूप मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन पुरूषांच्या बरोबरीने प्रत्येक कार्यक्षेत्रात काम करून नाव कमावले आहे याचा सर्वानी आदर करावा.

आपल्या समाजामध्ये पुरुषांचा स्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. मुलगा-मुलगी अजूनही भेदभाव केला जातो. पुरुष हा स्त्रीला त्याच्या हातातले खेळण, कटपुतली, त्याच्या इशाऱ्यावर बोटावर नाचणारी एक बाहुली समजतो. अजूनही आपल्या समाजामध्ये स्रियांना दुय्यम दर्जाचे स्थान दिले जाते. त्यामुळे स्रियांकडे बघण्याची मानसिकता आणि स्रियांविषयीचे विचार हा पुरुष कधी बदलुच शकत नाही. समाजातील घरातील पुरुषांची मानसिकता जर स्रियांविषयी बदलायची असेल, तर प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला येणारी मुलगा मुलगी समान मानली पाहिजे. दोघांनाही एकसारखे खेळणे दिले पाहिजे. आपल्याकडे मात्र मुलीला भांडी, बाहुली दिली जाते. आणि मुलांना बॅट बॉल दिला जातो. इथेच एवढा मोठा फरक केला जातो. कारण मुलगी ही घरात राहीली पाहिजे, आणि मुलगा घराबाहेर पडला पाहिजे. हे विचार जर बदलले तर आणि त्या दोघांनाही जर लहानपणापासून एकसारखी शिकवण दिली. तर नक्कीच पुरुषाची स्रियांकडे बघण्याची मानसिकता बदलेल. ज्या महिला आर्थिक स्वावलंबी आहेत त्या समाजाचे अन्यायकारक नियम झुगारून स्वतः निर्णय घेताना दिसतात. त्यामुळे महिलांना पुरुषांवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनवलं पाहिजे. तेव्हाच महिला स्वतः सामाजिक बेड्या तोडू शकतील. स्त्रीने काय करावे आणि काय करू नये हे देखील आपण का ठरवावे. तिला तिचे स्वातंत्र्य देण्याबाबत आपण संकोच का ठेवतो. प्रत्येक बाबतीत तिच्या व्यक्तीला विचारांना आपण आदर कधी करणार आहोत.

महिला सुशिक्षित, सक्षम समृद्ध आजही आहेत. उद्याही असतील आणि इथून पुढे ही होतील. पण आपल्या पुरुषी समाजाने हे स्वीकारायला हवे. तिच्यावविषयी आदर बाळगायला हवा. स्त्री स्वतंत्र्याच्या बाबतीत आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. परंपरा व संस्कृती ही जोपासत असतांना धर्माच्या नावाने तिच्या पायातील बेड्या तोडण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे. या समाजातील प्रत्येक महिला तसेच रस्त्याने जाणारी प्रत्येक मलगी ही एकटी नसून ती आपली किंवा माझी जबाबदारी आहे. हे स्वीकारले तर नक्कीच स्रियांच्या सामाजिक मानसिकतेच्या बेड्या तुटतील आणि आपला समाज माणुसकीच्या प्रवासातील हे क्रांतिकारी मोठं पाऊल ठरेल. आपण स्त्री स्वतंत्र्याच्या बाबतीत विचार करत असतांना कठोर कायदे करा असे म्हणतो पण कायदे करून प्रश्न सुटणार असतो की अधिक किचकट होणार असतो. आपल्या कायदेशीर पळवाट शोधली जाते. त्यामुळे कायदे करण्यापेक्षा तिचे स्वतंत्र्य आपण मान्य करावे. पुरुष म्हणून आपल्याला जसा विचार आणि निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तसा स्त्रीला देखील अधिकार आहे. अधिकार द्यायचा असेल तर स्त्री स्वातंत्र्याचा आपण स्वीकार केला पाहिजे.
✍️ मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close