अतिरिक्त ऊसाचे गाळप; राजुरी ग्रामस्थांकडून सुभाषआबा गुळवे यांचा सत्कार
प्रतिनिधी/संजय साखरे


राजुरी ता. करमाळा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांचा सत्कार करण्यात आला. राजुरी येथे या वर्षी जवळपास एक लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन झाले. त्यापैकी जवळपास पन्नास हजार मेट्रिक टन ऊस एकट्या बारामती ॲग्रो साखर कारखान्यांने गाळप करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे राजुरी तलावात चांगला पाणीसाठा झाला होता. याशिवाय जानेवारी महिन्यात आमदार संजय मामा शिंदे यांच्या प्रयत्नातून दहा वर्षांतून प्रथमच कुकडीचे पाणी राजुरी तलावात आणले होते. यामुळे उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले.
राजुरी येथे या वर्षी ऊस मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त झाला होता. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस जाईल की नाही याची चिंता मोठ्या प्रमाणावर भेडसावत होती. पण बारामती ऍग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी हा प्रश्न सोडवून शेतकऱ्यांना दिलासा दिला. याशिवाय १५ एप्रिल नंतर गाळपास आलेल्या जळीत उसासाठी कोणतेही रक्कम कपात न करता पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली. यामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली. राजुरी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुभाष आबा यांचे नेहमीच सहकार्य असते. यामुळेच राजूरी येथील अतिरिक्त उसाचा प्रश्न सोडविल्याबद्दल बारामती ऍग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचा कारखान्याच्या पिंपळी येथील कार्यालयात जाऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच डॉ. अमोल दुरंदे, आर. आर बापू साखरे, महादेव दुरंदे, नवनाथ दुरंदे, आकाश झोळ, उदय साखरे, नितीन साखरे, आप्पा साखरे आदी ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.



