
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


सोलापूर जिल्ह्यातील माढा विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्याबाबत वाढलेला तक्रारीचा सूर, याबाबत सेना भवन ला झालेली खलबते तसेच करमाळा व माढा या दोन्ही तालुक्यातून धनंजय डिकोळे यांच्या नेतृत्वाला जाहीरपणे होत असलेला विरोध हे पाहता येणाऱ्या काळात लवकरच शिवसेनेचे पदाधिकारी बदलाचे संकेत मिळत असून जिल्हा प्रमुख पदासाठी टेंभुर्णी येथील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढलेले संजय बाबा कोकाटे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे तसेच युवासेनेचे जिल्हाप्रमुख सचिन बागल यांची नावे चर्चेत असून या तिघांपैकी कोणाला तरी जिल्हा प्रमुख पदाची संधी मिळेल अशी शिवसेनेच्या गोटातून चर्चा आहे.
येत्या आठवड्यात सेनाभवन मधून पक्षांची परिस्थिती तपासण्यासाठी पक्षनिरीक्षक येणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. धनंजय डिकोळे यांनी जिल्हाप्रमुख या पदाच्या काळात पक्ष संघटनेसाठी कोणतेही काम केले नाही. केवळ आमदार बबनदादा शिंदे व संजय मामा शिंदे यांचे हस्तक म्हणून काम करतात. असा आरोप अनेक शिवसैनिकांनी शिवसेना सचिव अनिल देसाई यांच्यासमोर केला आहे.
नुकत्याच सोलापूर येथील युवासेनेच्या बैठकीत झालेल्या वादाच्या ठिणगीमुळे सुद्धा संपूर्ण जिल्ह्यातील शिवसेनेतील पदाधिकारी बदला असा सूर उमटू लागला आहे. येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणूक पाहता नवीन चेहऱ्यांना पदावर काम करण्याची संधी देण्याची मानसिकता वरिष्ठ नेते मंडळींची झाली आहे.
सोलापूर संपर्कप्रमुख आमदार तानाजीराव सावंत यांना हटवले शिवाय आम्ही काम करणार नाही. अशी भूमिका बहुतांश विद्यमान पदाधिकारी घेत असल्यामुळे गेली दोन वर्षांपासून शिवसेनेचे संघटन जिल्ह्यात मोडकळीस आले आहे. तर दुसऱ्या बाजूने संपर्कप्रमुख तानाजीराव सावंत यांनी काम करणारे निष्ठावान पदाधिकारी सोबत असतील तरच शिवसेना वाढू शकते. पदावर राहून जर विरोधकांशी हातमिळवणी करणारे पदाधिकारी असतील तर शिवसेना वाढणार कशी..? असा प्रश्न आमदार तानाजी सावंत यांनी पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या पुढे मांडला असून संपर्कप्रमुख व विद्यमान पदाधिकारी यांचा वाद शिगेला गेला आहे.
माढा विभागातून जिल्हाप्रमुख पद आत्तापर्यंत करमाळ्याला कधीही मिळालेली नाही. करमाळ्यात तीन वेळा धनुष्यबाण या चिन्हावर आमदार निवडून गेले. जिल्हा परिषद, पंचायत समिती शिवसेना जिंकली. मतांची टक्केवारी करमाळा तालुक्यात जास्त असतानासुद्धा सातत्याने माढा व पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील जिल्हाप्रमुख नेमल्यामुळे करमाळ्याला अद्यापपर्यंत जिल्हा प्रमुख पदाची संधी मिळाली नाही.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी करमाळा तालुक्यात गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेचे एकनिष्ठेने काम केले असून वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून अनेक रुग्णांना मदत केली. अनेक आंदोलने, मोर्चा यात त्यांचा सहभाग असून शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे त्यांनी मार्गी लावली आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी संधी मिळेल अशी चर्चा आहे.
धनंजय डिकोळे यांना तालुक्यातच शह देण्यासाठी माढा तालुक्यातील सचिन बागल यांना जिल्हा प्रमुख पद देण्यासाठी काही जण प्रयत्न करत आहेत. माढा विधानसभा निवडणुकीत ७७ हजार मते घेतलेले संजय बाबा कोकाटे हे सुद्धा जिल्हाध्यक्ष पदाच्या चर्चेत आहेत. यामुळे माढा विभागाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदी महेश चिवटे, संजय कोकाटे व सचिन बागल या तिघांपैकी कोणाला संधी मिळणार का यापेक्षाही दुसऱ्या चेहऱ्याला संधी मिळणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेत एवढा मोठा वाद होत आहे सोलापूर येथील बैठकीत युवासेना सचिव यांच्या समोर झालेला प्रचंड मोठा वाद झालं याबाबत संपर्कप्रमुख तानाजीराव सावंत सारखा कोणताही पदाधिकारी जाहीरपणे बोलत नाही. मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता वाढत आहे. अनेक जिल्ह्यात शिवसेना मजबूत होऊन निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना मात्र एकमेकाच्या काड्या करण्यातच व्यस्त आहे. यातच सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मजबूत होत असून नेमका शिवसेनेतील गटबाजीचा फायदा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उचलत आहे. एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेची भाकरी करपली असून ती फिरवल्या शिवाय शिवसेनेला उर्जितावस्था येणार नाही अशी चर्चा आहे.
शासकीय कमिटीमध्ये शिवसेना बेदखल
सोलापूर जिल्ह्यातील शासकीय कमिटीवर शिवसैनिकांना संधी मिळत नाही. विविध महामंडळावर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस नेते मंडळींची निवड होत आहे .याला विद्यमान पदाधिकारी जबाबदार असून शिवसेनेतील गटबाजीचा फायदा घेत राष्ट्रवादी जिल्ह्यातील प्रत्येक कामाचे श्रेय स्वतः घेत असल्याचे दिसून येते सोलापूर जिल्ह्यात होणारा विकास कामाच्या जाहिरातीत कोठेही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नसतो. याची खंतही निष्ठावान शिवसैनिक व्यक्त करत आहेत.




