करमाळा तालुक्यात विक्रमी गाळप करून कमलाभवानी शुगरच्या गाळप हंगामाची सांगता
प्रतिनिधी/संजय साखरे


करमाळा तालुक्यातील पांडे येथील कमलाभवानी रिफाइंड शुगर च्या गाळप हंगामाची सांगता आज रविवार दिनांक ०१ मे रोजी झाली असून चालू गाळप हंगामात कारखान्याने ७ लाख १५ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कमलाभवानी शुगर ने करमाळा तालुक्यात उच्चांकी गाळप केले आहे. करमाळा तालुक्या बरोबरच शेजारील कर्जत, परांडा व जामखेड तालुक्यात या कारखान्याचे सभासद असून तालुक्यातील सभासदांबरोबर या सभासद शेतकऱ्यांचा ऊस ही कारखान्यांने गाळप केला आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला करमाळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, माजी पंचायत समिती सदस्य विलास दादा पाटील, मानसिंगराव खंडागळे, सुजित तात्या बागल, अशपाक जमादार, पोपटराव सरडे, तात्या मामा सरडे, तात्यासाहेब पाटील, गणेश सरडे, तुकाराम शिरसागर, समाधान भोगे, विठ्ठल आप्पा सावंत, शहाजी झिंजाडे या मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात आले. या वर्षी साखरेचे दर वाढले असून ते आता ते ३३७५ रुपये पर्यंत गेले असल्याने शेतकऱ्यांना एफ. आर. पी. ची रक्कम वेळेत देणे शक्य होणार असल्याचे कारखान्याचे संस्थापक चेअरमन विक्रम शिंदे यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ऊस वाहतूक व तोडणी ठेकेदार यांची उर्वरित बिले लवकरच अदा केली जाणार असून कामगारांना पंधरा दिवसाचा पगार बक्षीस म्हणून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील वर्षी डिस्टलरी प्रकल्प चालू करण्याचा मानस असून यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३०० रुपये इतका अधिकचा दर देता येणे शक्य होणार आहे. यावर्षी कारखान्याने जवळपास सव्वा चार कोटी युनिट एवढी वीज निर्मिती केली असून त्यामुळे कारखान्याच्या प्रगतीला हातभार लागला असल्याचे त्यांनी सांगितले. चालू गळीत हंगामात कारखान्याला सर्वात जास्त ऊस तोडणी करणारे मुकादम, ऊस पुरवठा करणारे ठेकेदार व ऊस पुरवठा करणारे शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक ठेकेदार, तोडणी मुकादम यांच्यासह कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे डायरेक्टर जनरल एच.बी. डांगे साहेब यांनी तर सूत्रसंचालन संजय साखरे यांनी व आभार मुख्य शेती अधिकारी श्री. जगदाळे साहेब यांनी मानले.



