करमाळ्यात प्रथमच महिलांसाठी रोजा इफ्तार पार्टी संपन्न
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा शहरात बुधवार दि. २७ एप्रिल रोजी महिलांसाठी प्रथमच रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या ईफ्तार पार्टीचे आयोजन करमाळा शहरातील दगडी रोड, जुनी कन्या शाळेजवळील मोहल्ला गल्ली येथे करण्यात आले होते. अशी माहिती आयोजक ॲड. सविता शिंदे यांनी दिली.
ॲड. सविता शिंदे म्हणाल्या की, इफ्तार पार्टीचे आयोजन सर्रास पुरुषांसाठीच केले जाते. महिलांनाही अशा कार्यक्रमात सहभागी होता आले पाहिजे. शिवाय आज समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम धर्मांध शक्तींकडून केले जात आहे. त्यामुळे धार्मिक सौहार्द टिकविणे, वाढविणे व परस्पर धर्मीयांमधील वाढणारी दुरी नष्ट करण्यासाठी अशा उपक्रमाची गरज वाटली. त्यामुळे महिलांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना ॲड. सविता शिंदे पुढे म्हणाल्या की, मुस्लिम महिलांकडून या उपक्रमाला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. मुस्लिम व इतर धर्मीय अनेक लोकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. या रोजा इफ्तार पार्टीच्या आयोजनास ॲड. अपर्णा पदमाळे, कदिरा बेग, नुसरत शेख, शगुफ्ता शेख, जाकीर शेख, अश्फाक जमादार, आयुब शेख, ॲड. योगेश शिंपी यांनी सहकार्य केले.



