आदिनाथसाठी संचालक मंडळाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी; बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी
प्रतिनीधी/अंगद भांडवलकर


आदिनाथ सहकारी साखर कारखाना जाणीवपूर्वक सत्तेचा गैरवापर करून अडचणीत आणून बारामती ॲग्रो कारखान्याने ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालू केली आहे. त्यासाठी आदिनाथ संचालक मंडळाने तात्काळ उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णा सुपनर यांनी केली आहे.
सुपनर यांनी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिनाथ कारखाना करमाळा तालुक्याचा स्वाभीमान असून या कारखान्यावर केवळ ११० कोटी रुपये कर्ज आहे. आजूबाजूच्या शिंदे बंधूंच्या कारखान्याला ३०० कोटी रुपयांचे कर्ज शिखर बँकेने पुनर्घटन करून दिलेले आहे. मात्र जाणीवपूर्वक आदिनाथ कारखाना अडचणीत आणण्याचे काम पवार कुटुंब करत आहेत.
आदिनाथ कारखान्याची मालमत्ता २५० कोटी रुपयांची असून या कारखान्यावर बारामतीची वक्रदृष्टी पडली दृष्टी पडली आहे. आता न्यायालयातूनच करमाळा तालुक्यातील जनतेला न्याय मिळू शकतो. यामुळे तात्काळ रश्मी बागल यांनी ऑफलाइन विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी व या सभेत शिखर बँकेने चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईच्या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी. अशा आशयाचा ठराव मंजूर करावा व त्याच बरोबर आदिनाथ कारखान्याचे एक्झिक्यूटिव्ह मॅनेजर म्हणून कारखान्याचे सदस्य हरिदास डांगे यांची नियुक्ती करण्याचा ठराव विषय पत्रिकेवर घ्यावा अशी मागणी केली आहे.
आदिनाथ कारखान्याची तातडीने निवडणूक घ्यावी
अजिनाथ कारखान्याचा भाडेकरार प्रक्रिया घाईघाईने पूर्ण करून घेण्यासाठी आदिनाथ ची निवडणूक पुढे ढकलण्याचा काही नेतेमंडळीचा डाव आहे. विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. असे असताना जाणीवपूर्वक सहकार खात्यावर दबाव टाकून ही निवडणूक पुढे ढकलली जात आहे. तरी सहकार खात्याने तात्काळ आदिनाथ कारखान्याची वेळेत निवडणूक घ्यावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
सुदर्शन शेळके, करमाळा तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
साखरेचे फेर विक्री टेंडर काढावे
आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील शिल्लक असलेली साखर २९६७ रुपयांनी विक्री झालेली आहे. मात्र हे टेंडर दोन वर्षांपूर्वी झाले होते. आता साखरेचे दर ३७००/- रुपये क्विंटलपर्यंत गेले आहेत. या साखरेची फेर निविदा काढली तर काही व्यापारी ही साखर ३३००/- ते ३५००/- रुपये क्विंटल प्रमाणे घेतील. तरी या शिल्लक साखरेची फेर विक्री टेंडर काढावे. दोन वर्षांपूर्वीच्या जुन्या कमी दरात साखर विक्री केल्यामुळे प्रति पोते ५०० रुपयांचे कारखान्याचे नुकसान होत आहे. नियमानुसार संबंधित व्यापाऱ्यांनी टेंडर घेतल्यानंतर संपूर्ण साखरेची रक्कम आगाऊ भरणे गरजेचे असताना या व्यापाऱ्याने प्रक्रिया झाल्यानंतर साखरेच्या एकाही पोत्याचे पैसे भरले नाहीत. अशा व्यापाऱ्याला जुन्या भावात साखर देणे म्हणजे यात फार मोठा आर्थिक घोटाळा आहे.
देवानंद बागल, माजी संचालक, कृ.ऊ.बा.स. करमाळा



