सीना नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ; नदीकाठच्या ‘या’ गावांना सतर्कतेचा इशारा

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)


गेल्या दोन दिवसांत कमी झालेली सीना नदीची पाणीपातळी आज पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढली असून परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. करमाळा तालुक्यातील खडकी, तरटगाव व संगोबा येथील बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे.
जामखेड तालुक्यातील विंचरणा नदीचा व कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा तलावातील पाण्याचा विसर्ग सीना नदीपात्रात सुरू आहे. याशिवाय आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे व मांगी मध्यम प्रकल्पातील अनियंत्रित पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने सीना नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात जाणे धोकादायक ठरू शकते. तसेच आपल्या कुटुंबीयांना, लहान मुले व जनावरे यांना नदीपात्रात जाऊ देऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
संगोबा बंधाऱ्यावरील पूल वाहतुकीसाठी बंद
सीना नदीची मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढत असल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाकडून संगोबा येथील बंधाऱ्यावरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे बोरगाव, पोटेगाव, बाळेवाडी, तरडगाव, दिलमेश्वर वाघाचीवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे.
सीना नदीकाठच्या ‘या’ गावांना सतर्कतेचा इशारा…
खडकी, आळजापूर, बिटरगाव श्री, तरटगाव, बाळेवाडी, पोटेगाव, पोथरे, निलज, संगोबा, बोरगाव, जुनी खांबेवाडी, करंजे, भालेवाडी, दिलमेश्वर आदी गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.




