-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

खरंच आदिनाथ वाचवायचा की येणाऱ्या निवडणुकां आधी फक्त धुराळा उडवायचा? कारखान्यावर सत्ता भोगणार्यांना आदिनाथ बचाव चा विषय आत्ताच का सुचला? ॲड.अजित विघ्ने यांनी केले आजिनाथ बाबत अनेक प्रश्न


प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

 

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बचावासाठी गेल्या तीन चार दिवसांपासुन अनेक सर्वपक्षीय सन्माननीय नेतेमंडळींचे स्टेटमेंटस् मी वाचतोय. २३ तारखेला सर्व सभासदांनी आणि नेत्यांनी एकत्र विचारविनिमय करणेकरीता बैठकीचे आयोजन केल्याचेही अनेक मथळे छापुन आले आहेत. अतिरिक्त उसाच्या गाळपाचा जटील प्रश्न सर्वांचे समोर ‘आ’ करून असताना. बंद असलेल्या, कर्जाचा डोंगर असलेल्या, कामगारांची देणी थकीत असलेल्या, भ्रष्टाचाराने पोखरलेल्या, आपल्याच निष्क्रीय चेअरमन, संचालकांच्या सहीने भाडेतत्वावर कारखाना चालवायला देणेबाबतचा करार झालेला. आपल्या आदिनाथ कारखान्याला वाचविण्यासाठी सर्व एकत्र येत आहात याचा नक्कीच आनंद वाटतोय. परंतु, इतर कारखान्यांची ही धुराडी आता बंद होतील. कोणतीच यंत्रणा हाताशी नाही. कोट्यावधी रक्कम कर्जाची फेडुन त्यामधे परत कोट्यावधी रुपये टाकुन सर्व यंत्रणा मार्गस्थ करायचा खेळ सोप्पा नाही. ज्यांनी कारखान्यावर सत्ता भोगली त्यांना आदिनाथ बचावचा विषय आत्ताच का सुचला? कामगारांच्या आणि कारखान्याच्या विषयावर गेल्या दोन वर्षापासुन सडेतोड विषय मांडणारे दशरथ कांबळे यांना सुचलेलं शहाणपण सर्वांना उशिराने का सुचलयं.? एक तर आपल्या तालुक्यातील सभासद शेतकरी वर्गाला आणि पर्यायाने बैठक बोलवणाऱ्या नेत्यांना कारखाना बचावची हाक आत्ताच का दयावी वाटली? अनेकांची मत मतांतरे वेगळी आहेत. मित्रांनो २३ तारखेचा मेळावा नक्की होइलही आवेषपूर्ण भाषणे होतील, भावनिक साद घालणेचा प्रयत्न देखिल होइल. परंतु मेळावा संपुन सगळेच आपआपल्या घरी जातील आणि मग आदिनाथ बचाव- आदिनाथ बचाव हा फक्त चर्चेचा विषय होइल.

 

 

चालु गळीत हंगाम संपत चालला आहे. कारखान्याची निविदा होवुन, आदिनाथ कारखाना आमदार रोहीत पवारांचे बारामती अग्रोने चालविण्यास घेण्यासाठी पाऊले उचलली आहेत. अनेकांनी सुरुवातीला त्यांचे येण्याचे मनापासुन स्वागतही केले आहे. एन एस डी सी बँकेने त्यांचे कर्जवसुलीचे प्रकरण दाखल करून या प्रक्रीयेवर स्टे घेतला होता. आता ६५ कोटींची साखर विक्री होत आहे. बँकेचे पैसे बँक व्याजासह घेणारच आहे. तोपर्यंत दुसऱ्या बँका दारात असतील. त्यामुळे यावरही उपाय काढुन चालु वर्षी तरी आदिनाथ चालु करण्याचे धोरण पवारांकडुन आखले जात असताना कोणी या मिटींगची काडी टाकली ते गुलदस्त्यात आहे? उदया कळेलही परंतु अशा प्रकारांनी आदिनाथ चालु होण्याचे स्वप्न काही दिवसांसाठी नक्कीच पुढे जाईल हे मात्र नककी. आमदार संजयमामा आणि सुभाष गुळवे दिल्लीत पवार साहेबांना भेटले, चर्चा झाली. आमदार रोहितदादा, आमदार संजयमामा, सुभाष आबा गुळवे आणि टिम कारखाना चालु करतील आणि मग अनेकांची राजकीय दुकानदारी बंद होईल याची तर भीती नाही ना बाबांनो! असो उशिरा का होइना सावध झालाय पण हे बैठकीतले एकमत राहील का? शेवटपर्यंत तर याच उत्तर नककीच नाही हेच असणारं आहे. हे उशिराचे शहाणपण आदिनाथ ला अजुन खोलात नेईल हे वास्तव आहे.

 

 

आदिनाथ वाचवायचा आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकां आधी फक्त धुराळा उडवायचा आहे? अशीच काही जणांची धोरणे दिसत आहेत. मित्रांनो आजपर्यंत आपल्याला जमल नाही. शेतकरी, कामगारांच्या पेटत्या चुलीत पाणी ओतणारे नेते मंडळीही अशा मिटींगमधे (सर्वपक्षीय) सहभागी होतील आणि मग पहीले पाढे पंच्चावन्न! अरे आदिनाथ वाचविण्यासाठीची पाऊले पवारांकडुन वेगाने पडायला लागली की असल्या फालतु मिटींगच्या तकलादू कल्पना करताच कशाला? बारामती अग्रोच्या माध्यमातुन पवारांनी चोपडा सहकारी, कन्नड औरंगाबाद कारखाने घेतले आणि यशस्वीपणे चालु केले आहेत. अजितदादांचे दौंड शुगर्स, अंबालिका शुगर्स दमदारपणे चालु आहेत. मग पवारांचे कडे आदिनाथ गेल्यास आदिनाथ चे नुकसान होइलच कसे? आपण भुलथापांना भुलतो म्हणुनच आजपर्यंत चुकीची काही माणसे समोर आली. पण शेवटी वाटोळ झालंच. आता आदिनाथला फक्त पवारचं वाचवतील वस्तुतः आदिनाथ भाडे कराराने देण्याची प्रक्रिया झालेली आहे असे समजते. याबाबतची निविदा वर्तमान पत्रातुन प्रसिद्धीकरण झालेली होती. यातुनच बारामती अग्रो ने सदरची निविदा प्रक्रिया पार पाडुन करार केला आहे. परंतु एम सी डि सी बँकेने आपल्या थकीत कर्जासाठी मेहरबान कोर्टातुन स्टे घेतला आहे. तो उदया उठेल आणि नक्कीच कारखान्याची पाती परत फिरायला लागतील पण ही पाती फक्त मोकळी फिरवायची नाहीत तर त्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. यासाठी आवश्यक असण्या सर्व बाबींची पुर्तता करावी लागते. वाहतुक, तोडणीसह सर्व यंत्रणा सज्ज करावी लागेल. व्यापारी, कामगार आणि ऊस उत्पादकांचा विश्वास पुन्हा जागृत करावा लागेल आणि हे फक्त पवारच करतील असे वाटते. बरं कारखाना जरी चालवायला दिला तरी संचालक मंडळ निवडीची प्रक्रिया होणारच आहे. फक्त निवडुन येणारे नामधारी असतील. संचालकांच्या गाड्यांना डिझेल मिळणार नाही आणि कारखान्याचा कामगार घरात खुर्च्या, संतरंज्या उचलायला फुकट सापडणार नाही.

 

 

कारखान्याचा जुना इतिहास पाहता हा कारखाना उभा करताना स्व. गोविंद बापू पाटील व इतर अनेक निस्वार्थी मंडळींनी या कारखान्याची मुहुर्तमेढ देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे सहकार्याने रोवली. सुरुवाती पासुनच पवार साहेबांचे या कारखान्याकडे विशेष लक्ष आहे. अगदी गेल्या काही दिवसात २०१९ पुर्वी देखिल २५ कोटी रुपये मदत रूपी मिळवुन दिले होते हे सर्वश्रुत आहे. मग त्यांनीच हा कारखाना चालवायला घेतला तर काय वाईट आहे? नक्कीच या चांगल्या गोष्टी घडु नये म्हणुन सर्वपक्षीय मिटींग घेऊन जमाव दाखवुन पवारांना किती विरोध होतोय हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीतरी करत आहे. यामुळे मग पवार साहेब रोहीत दादाना सांगतील विषय सोडुन दे आणि मग पहीले पाढे पंच्चावन्न!

 

 

६५ कोटींची साखर विक्री करून १२८ कोटींचे कर्ज फेडुन, पुन्हा नव्याने सर्व यंत्रणा मार्गस्थ करण्याचे बोलणे सहज आहे. यासाठी प्रत्येकाची एकजुट आणि निस्वार्थ भावना आणि गमावलेला विश्वास पुन्हा निर्माण करायची शक्ती असेल तर ते शक्यही आहे. परंतु आता ओरडुन चार टाळकी गोळा करायची आणि दहा वेगवेगळ्या गटात, पक्षात, संघटनात काम करणारी मंडळी एकत्र आणायची आणि आदिनाथ बचाव म्हणुन आदिनाथ वाचणार नाही. उदया कार्यक्रमातुन पोटतिडकीने बोलतील, रडतील, पडतील पण कार्यक्रम संपुन घरी गेले की मी कसं काय बोललो. जमलेली लोकं काय बोलली म्हणुन फक्त विचारत राहतील. या मिटींगचा एक वेगळा मेसेज पवार साहेबांना जाईल. विरोध होत असेल तर कशाला करार करता म्हणुन पवार साहेब सांगतील आणि मग कुठ तरी परत कारखाना चालु होइल असे चित्र असताना आदिनाथ तसाच धुळखात राहील. मग राजकारण करायला नविन मुद्दे मिळतील. पवार आले की राष्ट्रवादी वाढेल मग संजयमामाची पण ताकद वाढेल, कार्यकर्त्यांची ताकद वाढेल, पवारांची एण्ट्री झाल्यावर मग अनेकांची दुकानदारी बंद होईल. पर्यायाने पवारांच्याच होलसेल दुकानात सगळ्यांची गर्दी होईल. अशी ज्यांना भीती वाटतेय अशा लोकांची उदयाची मिटींग आहे. हे कोणी ज्योतिषाने सांगायला नको.

प्रत्येकालाच आपले मत मांडायला मुभा आहे. परंतु मागचा पुढचा सगळा इतिहास तपासुन आदिनाथ कारखाना वाचावा म्हणुन फक्त बोलुन भागणार नाही. चांगल्या गोष्टीला विरोध करून चालणार नाही. हातचे सोडुन पळत्याच्या पाठीशी रहायचे नाही. आदिनाथ कारखाना चालु व्हावा, नियोजन बद्ध चालावा, गतवैभव प्राप्त होऊन कामगार, शेतकरी, सभासद यांना न्याय मिळावा. एवढीच माफक अपेक्षा ज्यांची असेल ते नक्कीच या कार्यक्रमापासुन दूर असतील. नक्कीच सर्वांनाच आदिनाथ महाराज सद्बुद्धी देतील असे वाटते आणि ज्यांना आदिनाथ महाराज सद्बुद्धी देणार नाहीत त्यांना नक्कीच बाहेरून बुद्धी देण्याचे महत्वपुर्ण काम करणाऱ्याची पोलखोल देखिल होईल. हे नक्की आहे!

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close