प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील केत्तुर, पोमलवाडीच्या लोकांनी पुनर्वसनामुळे निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी अनेक दिवस संघर्ष केला आहे. एक एक कोटी रूपयांची लोकवर्गणी गोळा करून गावातील रस्ते आणि पुल उभारले आहेत. याबाबत शेवटी हायकोर्टाने आणि महाराष्ट्र शासनाने दखल घेतली आणि अनेकांचे सहकार्याने केतुर- पोमलवाडीचे रस्ते व पुल प्रत्यक्षात साकारले आहेत. अशाच एका पोमलवाडी ते चांडगाव या ड्रीम प्रोजेक्ट साठी पश्चिम भागातील लोकांसह करमाळा तालुक्यातील लोकांची एक लोकचळवळ उभा राहीली. तर नक्कीच हा सुद्धा प्रोजेक्ट प्रत्यक्षात साकारल्या शिवाय राहणार नाही. या लोकचळवळी ला आम्ही सुरुवात केली असून यात सर्वांनी सहभागी व्हावे. असे आवाहन नुकतेच पाटील गटातून आमदार संजय मामा शिंदे गटात प्रवेश केलेले ॲड. अजित विघ्ने यांनी केले आहे.
उजनी जलाशयातील बारमाही पाण्यामुळे करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील शेती-उदयोग, मासेमारी व्यवसाय वाढत आहे. या भागात पर्यटनाला चालना मिळत असुन..उजनी धरणाचा विस्तीर्ण सुंदर काठ, मंदिरे पहाण्यासाठी, पक्षी निरिक्षणासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. या भागातुन आणखी एक जलमार्ग जो पर्यटनमार्गा बरोबरच विकासमार्ग होऊ शकतो. करमाळा तालुक्यातील पोमलवाडी ते इंदापूर तालुक्यातील चांडगाव हे अंतर फक्त ७३७.३९५ मीटर आहे. दोन्ही किनाऱ्या पर्यंत रस्ते उपलब्ध असल्याने नव्याने भू-संपादनाची आवश्यकता नाही. दोन्ही बाजुने दोनशे-दोनशे मीटर अंतराचे भराव आणि फक्त मधल्या छोट्याश्या ३५० मीटर अंतरात ब्रीज झाल्यास पश्चिम भागासह तालुक्याचा व या परिसराचा विकास निश्चित आहे. हा मार्ग फक्त दोन गावांना जोडणारा मार्ग नसुन अनेक तालुके, जिल्हे व विभाग जोडणारा मार्ग होईल.. हे निश्चित!..
याच ठिकाणावरून पुर्वी साखळीवर चालणारी बोट होती. त्याचे मनोरे (पिलर) आजही पाण्याची पातळी कमी झाल्यावर दिसुन येतात. हा आपल्या सर्वांसाठी, भागातील प्रत्येकाचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. हे भव्यदिव्य ड्रिम प्रत्यक्षात साकारता येईल परंतु यासाठी दृढनिश्चय, मांडणी व सर्वांच्या सहभागाची आवश्यकता आहे. आम्ही या लोकचळवळी ला सुरुवात करतोय. या चळवळीत प्रत्येकाने सहभागी व्हावे! असे आवाहन ॲड. अजित विघ्ने यांनी केले आहे.
करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील महत्वाचा डिकसळ पुलाचा प्रश्न मार्गी लावलेनंतर चांडगाव-पोमलवाडी या पुलासाठी प्रयत्नशिल राहु असे आश्वासन आमदार संजयमामा शिंदे यांनी दिलेले आहे. मध्यंतरी केत्तुर येथील अभ्यासिकेच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि आमदार संजयमामा शिंदे यांचेकडे याबाबतची मागणी केली आहे. या भागातील अॅड. अजित विघ्ने व मी याबाबतचा पाठपुरावा चालु केलेला आहे.
अशोकराव पाटील
माजी सरपंच, केत्तुर




