
माय मराठी न्युज नेटवर्क


वडिलांसोबत शेतात गेलेल्या एका पाच वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने झडप घातल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सातारा जिल्ह्यात घडली आहे. बिबट्या आपल्या लहान मुलाला घेऊन जात असताना वडिलांनी प्रसंगावधान राखत पाय धरून ओढल्या मुळे मुलाला जीवदान मिळाले.
कराड तालुक्यातील किरपे गावात गुरूवार दिनांक २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता धनंजय देवकर हे शेतातील काम उरकून घरी जाण्यासाठी निघाले होते. निघण्यापूर्वी ते शेती कामासाठीचे साहित्य पिशवीत ठेवत होते. त्यांचा पाच वर्षीय लहान मुलगा राज धनंजय देवकर हा त्यांच्या जवळच होता. शेती अवजार वडिलांना उचलून देण्यासाठी राज खाली वाकलेला असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने राजच्या मानेला पकडलं आणि ओढून शेतात घेऊन जाऊ लागला.
दरम्यान, आपला मुलगा राज याला बिबट्याने पकडल्याचे लक्षात येताच धनंजय देवकर यांनी प्रसंगवधान राखत आणि धैर्याने मुलाचे पाय पकडले आणि मुलाला बिबट्याच्या तोंडातून सोडविण्यासाठी ओढू लागले. यावेळी त्यांनी आरडाओरडाही केला. बिबट्या मुलाला ओढत शेतालगत असलेल्या तारेच्या कुंपनापर्यंत गेला, पण कुंपणामुळे त्याला मुलाला पुढे ओढता न आल्याने त्याने राजला सोडले. वडील धनंजय देवकर यांनी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे मुलगा राजला जीवदान मिळाले.
बिबट्याने केलेल्या हल्ल्यात राज देवकर याच्या मानेला व कानाला बिबट्याचे दात लागले आहेत. तर पाठीवर व पायावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. पाच वर्षीय चिमुकल्याला पुढील वैद्यकीय उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.



