
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील मौजे केम येथील श्री. राजेश उत्तरेश्वर तळेकर यांनी आपल्या घरासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरी झाली आहे. याबाबत राजेश तळेकर यांनी मोटार सायकल चोरी ची तक्रार केम येथील पोलीस चौकी मध्ये दाखल केली आहे.
हा प्रकार गुरूवार दिनांक १३ जानेवारी रोजी रात्री १:०० ते २;०० वाजे दरम्यान घडला आहे. राजेश ऊत्तरेश्वर तळेकर यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी आपल्या घरासमोर मोटरसायकल लावली होती. सकाळी उठल्या नंतर त्यांना गाडी दिसली नाही. त्यानंतर त्यांनी गावात व आजूबाजूच्या परिसरात गाडीचा शोध घेतला. पण त्यांना गाडी मिळाली नाही. या गाडीचा क्रमांक. MH-45-AM-9916 असून ही गाडी हिरो या कंपनीची व एच, एफ डिलक्स या मॉडेलची आहे. या गाडीचा रंग लालकाळा आहे.
तळेकर यांनी गाडीचा तपास आजुबाजुच्या गावांना करीत असताना त्यांना ढवळस तालुका माढा येथील पेट्रोल पंपावर चौकशी केली असता तेथील कामगारानी सांगीतले कि, केम हून रात्री दोनच्या दरम्यान अशी गाडी आली होती. तसेच त्या गाडीवर तिघेजण होते. त्यांची बोली भाषा मराठवाड्यातील होती. त्यांनी पाचशे रूपयाचे पेट्रोल गाडीमध्ये टाकले असे त्यांनी सांगितले. सदर गाडी ढवळस मार्गे गेली असल्याचा संशय आहे. या बाबत राजेश ऊत्तरेश्वर तळेकर यांनी केम पोलीसात तक्रार दिली आहे.
या अगोदर ही केम येथून गाड्या चोरीला गेल्या आहेत. त्याचा तपास अजून लागला नाही. त्यामुळे चोरट्यांचे फावत असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.



