नराधम डॉक्टरचा नर्सवर बलात्कार; डॉक्टरसह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल

माय मराठी न्युज नेटवर्क


औरंगाबाद मधील गारखेडा परिसरातील एका प्रसिद्ध हॉस्पिटल मध्ये काम करीत असताना पंचवीस वर्षाच्या आर एम ओ डॉक्टरने त्याच्या अन्य तीन साथीदारांसह परिचारिकेवर बळजबरीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातून पिडीत परीचारिकेला दिवस गेल्यानंतर नराधम डॉक्टराने गर्भपाताच्या गोळ्या खायला देऊन विनासंमती गर्भपात केला. दामिनी पथकाने केलेल्या मदतीनंतर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात डॉक्टर व अन्य तिघे जण यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली.
आरोपींमध्ये डॉ. प्रसाद संजय देशमुख, रेस्टॉरंटचा मालक दीपक पाटील, मेडीकल दुकानाचा चालक सचिन शिंदे यांच्यासह आणखी एकाचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित परिचारिका आणि आरोपी डॉक्टर हे एकाच हॉस्पिटल मध्ये काम करतात.
डॉ. देशमुख याने नोव्हेंबर २०२१ पासून परिचारिकेशी मैत्री केली. त्यानंतर त्यांने पडेगाव येथील फ्लॅटवर व अन्य ठिकाणी तीच्यावर बलात्कार केला. त्यातून ती गरोदर राहिली असता त्याने तिला गोळ्या देऊन गर्भपात केला. यात तिला प्रचंड वेदना झाल्यामुळे ती पुन्हा डॉक्टरकडे गेली. त्याने तिला मुकुंदवाडी भागातील नातेवाईकांच्या हॉटेलमध्ये नेऊन त्या परिस्थितीतही तिच्यावर बलात्कार केला आणि निघून गेला. त्यानंतर डॉक्टरचा मावस भाऊ दीपक पाटील याने पीडितेवर जबरदस्तीचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतुन सुटका करुन ती बाहेर पडली. डॉक्टरचा मित्र सचिन शिंदे आणि त्याचा अनोळखी मित्र यांनीही तिचा विनयभंग केला. तेथून पीडित परिचारिका सिडको बसस्थानकात येऊन बसली होती. तिला असह्य वेदना होत असल्याचे पाहून तेथील सुरक्षा रक्षकाने दामिनी पथकाला माहिती दिली. दामिनी पथकाच्या प्रमुख उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, हवालदार लता जाधव, निर्मला निंभोरे, मनीषा बनसोडे, गिरिजा आंधळे यांच्या पथकाने येऊन पिडीतेची विचारपूस केली आणि मुकुंदवाडी ठाण्यात नेऊन गुन्हा नोंदवला.



