केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील निंभोरे येथील फरतडे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या रंगरांगोटीचे काम “स्वच्छ शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. भोंग साहेब व विस्तार अधिकारी श्री. बदे साहेब केम केंद्र प्रमुख श्री. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भैरू वाळेकर यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूंच्या संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे बऱ्याच वर्गाची व शाळेच्या परिसराची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या “स्वच्छ शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमांतर्गत करमाळा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्री. राजाराम भोंग साहेब व विस्ताराधिकारी श्री. अनिल बदे साहेब तसेच केमचे केंद्रप्रमुख श्री. महेश कांबळे सर यांच्या मार्गदर्शनानुसार शाळेची रंगरंगोटी मुख्याध्यापक अरुण चौगुले व उपशिक्षक राम काळे या दोघांनी पेन्टरची मदत न घेता स्वतः रंग देऊन चित्रे काढली आहेत. विशेष म्हणजे यासाठी शाळेचा एकही रुपया न घेता त्यांनी स्वखर्चाने ही चित्रे काढली आहेत. यावरून त्यांचे शाळेविषयी असलेले प्रेम आहे दिसून येते.
शाळेची रंगरांगोटी केल्याने विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आकर्षण वाटत आहे. शासनाने शाळा सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुंदर शाळेमध्ये प्रसन्न वाटेल व विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल. या हेतूने हे काम येथील शिक्षकांनी हाती घेतले असल्याची माहिती भैरू वाळेकर यांनी दिली आहे. या शाळेचे व शिक्षकांचे निंभोरे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.



