
प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


पेरणे फाटा, ता. हवेली येथील विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्यात आली असून महाराष्ट्र शासनाच्या देखरेखीखाली पहिल्यांदाच होत असलेल्या मानवंदना कार्यक्रमाचे नियोजनामुळे पेरणे फाटा, कोरेगाव भीमा येथील परिसर चकाचक झाला असल्याने मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच येणाऱ्या सर्व अनुयायांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात येणार असल्याची माहिती पेरणे चे सरपंच रुपेश ठोंबरे यांनी दिली आहे.
यंदा शासनाच्या वतीने रणस्तंभासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तसेच पुणे नगर महामार्गावर येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रणस्तंभ ते आळंदी फाटा या रस्त्याच्या दुभाजकांवर ८४ कोटी रुपये खर्चून ११८ नव्याने विद्युत स्ट्रीट लाईट बसविण्यात आल्याने उशिरा मानवंदना देऊन परतणाऱ्या अनुयायांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून विजयस्तंभ परीसर स्वच्छता करून त्या ठिकाणी उत्कृष्ठ पणे सपाटीकरण करण्यात आल्याने या भागात विविध उपक्रम कोरोनाचे नियम पाळत घेता येतील. तसेच येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची व्यवस्था करण्यासाठी १८ वाहन तळे तब्बल १६० एकर क्षेत्रात करण्यात आली आली. स्तंभाची फुलांची सजावट, पोलीस टॉवर, पोलीस मदत केंद्रे, माहिती फ्लेक्स, बॅरिकेट, स्तंभावर मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना दर्शन बारी आदी उपयोजना सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. त्याच बरोबर शिरूर (कोरेगाव भीमा) व हवेली (विजयस्तंभ) या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पुणे नगर महामार्गावरील पुलाची डागडुजी या निमित्ताने करण्यात आली. पुलावरील माती बाजूला करत पुलाचे कठडे रंगविण्यात आले. तसेच या पुलाच्या शेजारी असलेल्या जुन्या पुलाच्या बाजूला असलेला स्तंभ पुन्हा नव्याने बसविण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले, सहाय्यक अभियंता जान्हवी रोडे, शाखा अभियंता प्रशांत पवार, नामदेव राठोड तसेच यांच्या संपूर्ण टीम ने अहोरात्र काम केल्याने त्यांचे स्थानिक प्रशासनाच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे. तर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी ६०० मोबाईल टॉयलेट, पाण्याचे १०० टँकर, ८ घंटा गाडी, कचरा कुंडी व सफाईसाठी कर्मचारी, भिशी पावडर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून येणाऱ्या भाविकांचे गुलाब पुष्प व बाटली देऊन पेरणे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात येणार असल्याचे सरपंच रुपेश ठोंबरे व ग्रामसेवक के एल थोरात यांनी सांगितले.




