केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील देवकर वस्ती वरील दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सकाळी ०८:०० वाजता दत्तमुर्तीचा अभिषेक करण्यात आला व नंतर सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत ह.भ.प पाटील महाराज लोहारा, परांडा यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. त्यानंतर १२ वाजून ३० मिनिटांनी दत्त जन्म झाल्यावर मंदिरात गुलाल व पुष्प वृष्टी करण्यात आली. तसेच त्यानंतर महिला भाविकांनी सुरेल आवाजात दत्त जन्माचा पाळणा गायला.
या धार्मिक कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. अनिरुद्ध कांबळे व राजकारणातील किंग मेकर अजित दादा तळेकर यांची उपस्थिती होती. यानंतर आलेल्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या दत्त जंयती सोहळ्यासाठी बलभिम तुकाराम बिचीतकर, देवकर वस्ती, दत्त मंदिर कमिटी व बिचीतकर मळा तरूण मंडळ यांनी परिश्रम घेतले.
किर्तन चालू असताना ३ वर्षाचा मुलगा बेशुद्ध पडला अन्….
दत्त जन्म सोहळ्यानिमित्त किर्तन चालू असताना महादेव धोंडिराम दिवे यांचा नातू शिवतेज संतोष नांदे (वय ३ वर्ष) हा मुलगा अचानक बेशुद्ध पडला. त्याचे हात पाय गार पडले. सर्व भाविक भक्त घाबरली होती. त्याला त्वरीत दत्त भक्त दत्तात्रय बिचितकर यांनी गावातील डाॅ. कुरडे यांच्या दवाखान्यात आणले. डाॅ. कुरडे यांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी या मुलाला बार्शी किंवा कुर्डुवाडी येथे दवाखान्यात नेण्यास सांगितले. परंतु, त्याला परत दत्त मंदिरात आणून दत्ताच्या पायावर लोटांगण घातले. त्याचवेळी तिथे त्याची परिस्थिती सुधारली. हा एक मोठा चमत्कार झाला असल्याची एकच चर्चा भाविकांमध्ये सुरू होती.




