सोलापूर जिल्ह्यातील शेतीपंपाचा वीजपुरवठा आठ तास करावा; जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी केली ‘यांच्या’ कडे मागणी
केम प्रतिनिधी/संजय जाधव


सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी असणारा विद्युत पुरवठा महावितरण कंपनीने केवळ एक तास केला आहे. हा विद्युत पुरवठा आठ तास करावा अशी मागणी सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचेकडे केली आहे.
गेल्या दिड वर्षा पासून लाॅकडाऊन मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. हाता तोंडाशी आलेली पिके जळायला लागली आहेत. शेतकऱ्यांनी या वर्षी उडिद मोठ्या प्रमाणावर केला आहे. श्रावण महिना संपला तरी पाऊस नाही. विहिरींमध्ये असलेले पाणी विजे अभावी देता येत नाही. एक तासांमध्ये दोन सऱ्या सुध्दा भिजत नाही. मग शेतकऱ्यांनी करायचं काय अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. महावितरण कंपनीने शेतीपंपाची बिले थकित असल्याचे कारण देत विद्युत कनेक्शन तोडली आहेत. तथापि महावितरण कंपनीकडून शेतीपंपाची बिले शेतकऱ्यांना प्राप्त झाली नाहीत. तसेच काही शेतकऱ्यांनी विज बिले भरलेली असताना देखील शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन तोडली जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. हा प्रकार त्वरीत थांबवावा अशी मागणी ही जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी केली आहे. मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांचा अंत न पाहता ताबडतोब सोलापूर जिल्ह्यातील वीजपुरवठा आठ तास करावा अशी मागणी केली आहे.



