
केम प्रतिनिधी/संजय जाधव


श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ, मंगळवेढा संचलित श्री. नागनाथ मतिमंद निवासी विद्यालय, केम तालुका करमाळा येथील या शाळेत शुक्रवार दिनांक ०३ डिसेंबर २०२१ रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.
दिव्यांग मुलांच्या क्रीडा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पालकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. चव्हाण ए. एम. यांनी केले.
दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग मुलांचा व पालकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. भानुदास काळे हे होते. दिव्यांग मुलांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये स्पॉट, लांब उडी मारणे, बादलीत बॉल टाकणे, संगीत खुर्ची, निंबू चमचा, रिंग मधून बॉल टाकणे तसेच रंगभरण या स्पर्धाचे आयोजन केले होते. विजयी स्पर्धक व सहभागी विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
दिव्यांग मुलाविषयी व दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना व सवलती याबाबत विशेष शिक्षिका श्रीमती जाधव व्ही. बी. यांनी पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री नागनाथ मतिमंद निवासी विद्यालय, केम या शाळेकडून दिव्यांग विद्यार्थी व पालक यांना मिष्टांन्न भोजन देण्यात आले. या कार्यक्रमास सर्व कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. नाळे एच. एस. यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.




