प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांना मिळाव्यात म्हणून ”आमदार आपल्या दारी” हा उपक्रम राबविला जाणार आहे. २६ तारखेला रावगाव गणातून याची सुरुवात होणार आहे, अशी माहिती करमाळा माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंंदे यांनी गुरुवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, डॉ. विकास वीर, राष्ट्रवादी युवकचे तुषार शिंदे, राजेंद्र बाबर, हिंगणीचे माजी सरपंच हनुमंत पाटील, सुरज ढेरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या विषयी अधिक माहिती देताना आमदार शिंदे म्हणाले की, ‘कोरोना कालावधीमध्ये काम करण्यासाठी अनेक अडचणी होत्या. आता परस्थितीमध्ये सुधारणा होत आहे. नागरिकांना आपल्या गावाजवळ सुविधा मिळाव्यात व शासकीय योजनांची माहिती मिळावी म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे. शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देणे यासह आधार कार्ड, संजय गांधी निराधार योजना, मोतिबींदू तपासणी, एसटी बस पास, प्रधानमंत्री आवास योजना, श्रावणबाळ योजना, उज्ज्वला गॅस योजना, ईश्रम आदी शासकीय योजनाची माहिती दिली जाणार आहे. तसेच नागरिकांच्या अडीअडचणी समजून त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. यावेळी बोलताना सुजित बागल म्हणाले की, नागरिकांना गावातच शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न केला जात आहे. २६ नोव्हेंबर २०२१ तारखेला रावगाव येथून या उपक्रमाची सुरुवात होत आहे.
यावेळी डॉ. विकास वीर सर यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. प्रत्येक गटात व गणात हा उपक्रम राबवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
रायगाव येथील शिबिरामध्ये वंजारवाडी, लिंबेवाडी, भोसे, पिंपळवाडी, मोरवड, पुनवर व वडगाव दक्षिण येथील नागरिकांनी उपस्थित रहावे व आपल्या अडचणी सोडवाव्यात असे आवाहन आ. संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी आमदार शिंदे व उपस्थितांच्या हस्ते आमदार आपल्या दारी या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.



