महावितरण कडून शेतीपंपाचा विजपुरवठा पूर्णपणे बंद; केमच्या वाड्या वस्त्या तीन दिवसांपासून अंधारात
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील शेतकऱ्यांचे वीज बिल थकल्यामुळे महावितरण कंपनीने शेतीचा वीज पुरवठा पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे वाडया- वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांना पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामध्ये काही अपघात झाल्यास याला जबाबदार कोण राहणार..? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून केला जात आहे. शेतकरी वीज बील भरण्यासाठी तयार आहेत. परंतू, दोन तास का होईना वीजपुरवठा चालू करा आणी वीजबिल वसुली करा. म्हणजे आमच्या जनावराना व आम्हाला वेळेवर पाणी पिता येईल. अशी भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
सोमवार दिनांक १६ नोव्हेंबर पासून केम येथील निमोणी मळा, बिचीतकर वस्ती, लोंढे वस्ती, पटाड शिवार, चांभार वाडी या वाड्या- वस्त्या वरील वीजपुरवठा बंद केला आहे. या वस्त्यांवरील नागरिक गेले तीन दिवस अंधारात राहत आहेत. आता रॉकेल ही बंद झाल्याने अक्षरक्षा शेतकरी अंधारात आहेत. गेले तीन दिवस झाले जनावरे पाण्यावाचून तरफडत आहेत. शेतकरी जीव धोक्यात घालून सात परसाच्या विहरिमधून पिण्यासाठी पाणी काढत आहे. शेजारील माढा तालुक्यातील गावात दोन तास वीज पुरवठा आहे. मात्र, करमाळा तालुक्यात असे का..? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहे. परवा पाऊस झाल्यामुळे निसर्गाने पिकाला पंधरा दिवस का होईना आधार दिला आहे. शेतकरी वीज बिल भरायला तयार आहेत पण त्यांची एकच मागणी आहे की, आमच्यासाठी नाही परंतु जनावरांच्या पाण्यासाठी तरी दोन तास वीज पुरवठा करावा. अशी शेतकऱ्यांनी विनंती केली आहे.
याबाबत महावितरण अधिकारी परीट साहेब यांच्याकडे विचारणा केली असता शेतकरी बिल भरत नाही. त्यामुळे, आम्हाला वीज पुरवठा बंद करावा लागतो. दोन तास वीजपुरवठा करा असे म्हटले तर सोडतो असे ऊत्तरे दिले जाते. मात्र, वीज पुरवठा सुरू केला जात नाही. गेली तीन दिवस झाले शेतकरऱ्याचे हाल होऊ लागले आहेत.
केमेश्र्वर सुरवसे
शेतकरी




