-->
करमाळासामाजिक

उत्तरेश्वर विद्यालयात गुरुजन कृतज्ञता व माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, केम येथे गुरुजन कृतघ्नता आणि माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन एसएससी बॅच १९८४-८५ च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. सर्वप्रथम शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन श्री. कांबळे पी. एस व या कार्यक्रमाचे संयोजक कालिदास तळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कदम सर होते.

यावेळी माजी प्राचार्य डी.बी. शिंदे, श्री. एम.पी. सुरवसे, श्री. बी.एन. सोलापुरी, श्री. घोंगडे सर, श्री. डी.डी. तळेकर, श्री. पाटील, श्री. डी.व्ही. सातव, सौ. शिंदे मॅडम, जाधव मॅडम तसेच या विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. १९८४-८५ च्या बॅचला शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. माजी विद्यार्थी कारखानदार प्रदीप येवले यांनी केमचे वैशिष्ट्य कुंकू हळद यांची पाकिटे देऊन शिक्षकांचा सन्मान केला. तर या कार्यक्रमाचे संयोजक नंदकुमार तळेकर यांच्याकडून ‘भूले बिसरे गात’ ही पुस्तके व शाल, श्रीफळ देऊन गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. यानंतर सध्या हयात नसलेली माजी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच कोरोना काळामध्ये मृत्यू पावलेल्या सर्वांच्या कुटूंबातील नातेवाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या नंतर माजी विद्यार्थ्यांचा सत्कार गुरूजंनाच्या वतीने करण्यात आला. माजी विद्यार्थी दिलीप मोळिक सर, नंदकुमार तळेकर, वैजिनाथ मोटे, संगिता भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये जुन्या आठवणीला ऊजाळा देताना शिक्षकांच्या तासाला घडलेला प्रसंग, छडीचा मार, ऊठा बस्या करण्याची शिक्षा, जादा तास, क्रिडा, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यांची आठवण करून दिली.

माजी शिक्षक प्राचार्य मोकाशी सर यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यालयात प्रथमच माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन घेण्यात आले. याबद्दल या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी कौतुक केले. या स्नेहसंमेलनामुळे जुने मित्र, मैत्रिण, शिक्षक वर्ग यांच्या भेटी झाल्याने हा क्षण वेगळाच असतो. या कार्यक्रमाचे आयोजन कालीदास तळेकर, प्रदिप येवले, आजीनाथ जाधव यांनी केले. शाळेला गुरूदक्षिणा म्हणून या बॅचच्या वतीने स्मार्ट टिव्ही भेट देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संगिता भोसले, सौ. लिना शहा यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार तळेकर यांनी केले. तर आभार नवनाथ बोंगाळे, प्रदिप येवले कालीदास तळेकर यांनी मानले. यानंतर सर्व शिक्षक, माजी विद्यार्थ्यांसाठी भोजनाची मेजवानी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी कालीदास तळेकर, मोमीन सर प्रदिप येवले, आजीनाथ जाधव यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close