केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील द्राक्ष बागायतदार व ऊस टोळीचे मालक दत्तात्रय बिचितकर यांनी दिवाळी हा सण ऊस तोड मजुरांसोबत साजरा केला. विदर्भामधील वाशिम जिल्ह्यातील उंबरी, तालुका मानवत या गावातील ऊसतोड मजुर सध्या कव्हे, ता. माढा येथील बागायतदार शेतकरी तुकाराम कंरडे, अशोक काळे यांच्या शेतात ऊसतोड चालू आहे. या टोळीत एकूण ३६ कोयते ऊस तोडणी चे काम करत आहेत.
दिवाळीच्या सणाला या मजुरांना जाता येत नाही. आपल्या गावापासून कोसो दूर असल्यामुळे गोडधोड जेवण मिळत नाही. सध्या उसतोडीचे काम करीत असलेल्या गावात दिवाळी साजरी होत असते पण, त्यांच्यासाठी आला दिवस सारखाच असतो. त्यांना दिवाळीचा आंनद मिळावा म्हणून टोळी मालक दत्तात्रय बिचितकर यांनी पाडव्या दिवशी सांयकाळी मजुरांना मेजवानी दिली. यामध्ये लाडू,चिवडा, कंरजी, बर्फी, शंकर पाळी, पोळी, भात, सांबर, श्रीखंड असे जेवण दिले. या भोजनाचा ऊसतोड कामगार, स्त्रीया व त्यांच्या लहान मुलांनी आस्वाद घेतला.
या वेळी टोळी चे मुकादम अशोक साळुंखे यानी सांगितले कि, आम्हा मजुरांना दिवाळी साठी गावाकडे जाता येत नाही. परंतु, आमचे टोळी मालक दत्तात्रय बिचितकर यांनी आमच्या सोबत दिवाळी साजरी केली. यापुढेही असेच टोळी मालकांनी आम्हा ऊसतोड कामगारांसोबत दिवाळी साजरी केली तर आम्हाला या सणाचा आंनद घेता येईल असे त्यांनी सांगितले. या साठी दत्तात्रय बिचितकर, संजय बिचितकर, गणेश भैय्या बिचितकर, भैरू ढेरे यांनी परिश्रम घेतले.




