करमाळा तालुक्यातील ‘या’ कारखान्याकडून मिळाले नाही ऊसबिल; सुशिक्षित तरुणावर आली आत्महत्येची वेळ
प्रतिनिधी / अंगदभांडवलकर


करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील सुशिक्षित तरुण शेतकरी समाधान सुरेश कांबळे यांचा ऊस मकाई सहकारी साखर कारखानाकडे गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये १९ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान गाळपास गेला होता. सदर ऊस कारखान्याकडे गाळपास जाऊन तब्बल सात महिने उलटले तरी त्यांना अद्याप ऊस बिल न मिळाल्याने त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. याप्रकरणी त्यांनी साखर आयुक्तालयाकडे सदर कारखान्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले आहे.
समाधान कांबळे हे उंदरगाव येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण M.A. M.Phil झाले असून ते आपला वडिलोपार्जित शेती हा व्यवसाय करतात. सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मी मौजे उंदरगाव ता. करमाळा, जि. सोलापूर येथील कायमचा रहिवाशी असून माझा जमीन गट नं. ७५/२ मधील १.०० हे. आर. क्षेत्रातील ऊस १९ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी २०२१ रोजी श्री. मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी पो. जिंती ता. करमाळा, जि.सोलापूर या साखर कारखान्याला ३८ टन ऊस गाळपासाठी दिलेला आहे.
सदर कारखान्याचा मी रितसर सभासद असूनही अद्यापपर्यंत मला माझे ऊस बिल मिळालेले नाही. सध्याची माझी आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असून कोरोना काळात माझ्या घरातील सदस्य आजारी असताना त्याचबरोबर माझ्या बहिणीची डिलीव्हरीच्या वेळेससुध्दा मला पैशाची अत्यंत गरज होती परंतु सदर कारखान्याचे प्रशासन व कर्मचारी यांनी उडवाउडवीची व बेत्ताल उत्तरे देऊन माझी घोर फसवणूक केलेली आहे. त्यामुळे माझे संपूर्ण कुटुंब तणावाखाली वावरत असून कुटुंबावर उपासमाराची वेळ आली आहे.
तरी मा. महोदय आपणांस विनंती आहे की, माझे ऊसबिल व्याजासह मला मिळावे. मी आर्थिक संकटात असून मला आत्महदहन केल्या शिवाय मला पर्याय नाही. तसेच शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्याचा ऊस कारखान्यामध्ये गाळपास गेल्यानंतर १४ दिवसाच्या आत एफ.आर.पी. रककम देणे बंधनकारक आहे. तरी सुध्दा माझे बील फेब्रुवारी पासून दिलेले नाही. तरी या साखर कारखान्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांचे गाळपास चालु हंगामात परवानी देण्यात येवून नये.
सदर निवेदनाच्या प्रती त्यांनी मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. उपमुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. सहकार मंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा.जिल्हाधिकारी साहेब, सोलापूर जिल्हा सोलापूर, मा.तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय, करमाळा, मा.चेअरमन साहेब, मकाई सहकारी साखर कारखाना लि. भिलारवाडी पो. जिंती, ता. करमाळा जि. सोलापूर यांचेकडे माहितीसाठी दिलेल्या आहेत.



