अखेर प्रतिक्षा संपली; उजनी धरण १०० टक्के भरून ११० टक्के कडे वाटचाल
प्रतिनीधी / संजय साखरे


सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण आज दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी शंभर टक्के भरले आहे. यामुळे अनेक दिवसांपासून उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याकडे डोळे लावून बसलेला धरणग्रस्त शेतकरी सुखावला आहे. उजनी धरण शंभर टक्के भरण्याची प्रतीक्षा आज संपली आहे.
आज अखेर उजनी जलाशयात एकूण ३३२० दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा झाला असून उपयुक्त पाणीसाठा १५१७.९२० दशलक्ष घनमीटर इतका आहे. हा प्रकल्प आता १०० टक्के भरला असून त्याची ११० टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. काल पुणे शहर, पुणे जिल्हा आणि परिसरात झालेल्या जोरदार पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून सध्या दौंड येथून उजनी धरणात जवळपास सहा हजार क्युसेक एवढा विसर्ग चालू आहे.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरची जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यातील जवळपास ३३ साखर कारखाने या वर्षीच्या गाळप हंगामात ऊस गाळप करण्यास सज्ज आहेत. गेल्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे उजनी बॅकवॉटर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली होती. त्याचा फायदा या वर्षी साखर कारखान्यांना होणार आहे. याहीवर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे या वर्षी देखील ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर होणार असून पुढील वर्षी साखर कारखान्याना याचा फायदा होणार आहे. दरम्यान या वर्षी उजनी धरण भरण्यास खूप विलंब लागला असला तरी अखेर उजनी धरणाने शंभरी गाठल्यामुळे धरणग्रस्त शेतकरी सुखावला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.



