केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील केम केंद्राच्या वतीने केंद्र प्रमुख महेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ तळेकर विदयालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व आपल्या देशाचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती प्रथम प्रतिमांचे पूजन करून व शिक्षक निबंध स्पर्धा घेऊन मोठया उत्साहात पार पडली.

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप स्वामी साहेब यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त शिक्षक निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानुसार केम केंद्रातील राजाभाऊ तळेकर माध्यमिक विद्यालयात गांधी जयंती निमित्त निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीला महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन केंद्र प्रमुख महेश कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी मुख्याध्यापक मनोज तळेकर, नागनाथ तळेकर, तुकाराम तळेकर, बाळासाहेब देशमुख व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. त्यानंतर शिक्षक निबंध स्पर्धेला सुरूवात झाली. या निबंध स्पर्धेसाठी ”विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकाची भूमिका” हा विषय होता. या निबंध स्पर्धेसाठी केम केद्रातील जिल्हा परिषद शाळेतील २६ शिक्षक व १४ शिक्षीका असे मिळून ४० जणानी सहभाग घेतला. या परिक्षेसाठी परिक्षक म्हणून श्री. ऊत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज चे प्राध्यापक डाॅ. मच्छिंद्र नांगरे, बाळासाहेब देशमुख व राजेंद्र गायकवाड यांची नेमणूक केली होती.
या निबंध स्पर्धेमागे कोरोना काळात गेल्या दिड वर्षापासून शाळा बंद असल्याने शिक्षकांना चालना मिळावी हा उद्देश दिलीप स्वामी साहेब यांचा आहे. त्यांनी कोरोना काळामध्ये शाळेची दूरवस्था होऊ नये म्हणून “स्वच्छ शाळा, सुंदर शाळा” हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत राबविला होता. या उपक्रमाचे संपूर्ण राज्यात कौतुक होत आहे. या निबंध स्पर्धेसाठी संयोजक महेश कांबळे, भाऊराव तळेकर, बाळासाहेब देशमुख सुरेश पवार यांनी परिश्रम घेतले.




