करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील देवळाली गावचे युवा सरपंच व करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती कै. कल्याण भाऊ गायकवाड यांचे पुत्र आशिष कल्याणभाऊ गायकवाड यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाचा राजीनामा कारखान्याचे कार्यकारी संचालक व चेअरमन हे कारखाना स्थळावर उपलब्ध नसल्याने त्यांच्या मोबाइल वर व्हाट्सअप द्वारे पाठवला आहे.

गेल्या दोन महिन्यात आदिनाथ कारखान्याच्या तिसऱ्या संचालकाने आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. गाळप हंगाम तोंडावर असताना व तालुक्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असतानाच कारखाना चालू होणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यातच हे संचालकांचे राजीनामा सत्र आणखी किती दिवस चालणार आणि अजून किती संचालक आपला राजीनामा देणार याबाबत तालुक्यामध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.
आशिष गायकवाड यांनी स्वेच्छेने आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिला असून ते येत्या ४ ऑक्टोबर रोजी शिंदे गटामध्ये आमदार संजय मामा शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचीही चर्चा आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक कल्याण भाऊ गायकवाड यांच्या निधनानंतर बागल गटाकडून आशिष गायकवाड यांची संचालक पदी वर्णी लागली होती.
आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे विकास कामे करण्याची धमक आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व समर्थकांचा विचार घेवुन शिंदे गटासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून देवळाली सह पंचक्रोशीतील गावात विकासकामे करुन समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आज आदिनाथ च्या संचालक पदाचा राजीनामा चेअरमन व कार्यकारी संचालक यांच्याकडे पाठवला आहे. येत्या चार तारखेला मेळावा घेऊन आमदार संजय शिंदे गटात प्रवेश करत आहे.
आशिष कल्याणभाऊ गायकवाड




