२४ तासात फिडर डीपी पूर्वरत न केल्यास विद्युत वितरण कार्यालयाला ठोकणार टाळे : पै. संदीप भोंडवे
कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


विद्युत महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता भीमा नदी पट्ट्यातील फिडर डीपी बंद केल्या आहेत. त्या जर २४ तासात सुरू झाल्या नाही तर, उद्या दि. २० सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या पेरणे, ता. हवेली येथील कार्यालयाला टाळा ठोकणार असल्याचा इशारा हवेली चे भाजपा तालुका अध्यक्ष पै. संदीप भोंडवे यांनी दिला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून विद्युत महावितरण कंपनी शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता शेतकऱ्यांच्या शेतीवर चे फिडर बंद करत आहेत. तसेच सक्तीची वीज बील वसुली करत आहे. मुळामध्ये गेली दोन वर्षे अनेक शेतकऱ्यांना बिले सुद्धा आलेली नाहीत. जी बिले आलेली आहेत त्यामध्ये सावळागोंधळ आहे. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन-तीन वर्षापासून शेतकऱ्यांचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले आहे. मंत्रिमंडळातील विद्यमान मंत्र्यांनी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करणार आहोत, त्याची वसुली करू नका असे विधिमंडळामध्ये स्टेटमेंट दिले असतानासुद्धा हवेली तालुक्यामध्ये वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना कुठल्याही गोष्टीची कल्पना न देता लाईट फीडर बंद करण्याचे काम सुरू केले आहे. ज्यांनी लाईट बिले भरलेली आहे अशाही शेतकऱ्यांची यामुळे वीज कनेक्शन कट झालेले आहे.
विद्युत पुरवठा नसल्याने पूर्ण शेतीमालाचे नुकसान होत असून उभी पिके विजेमुळे जळण्याच्या मार्गावर आहेत. ही गोष्ट अन्यायकारक असून जर विद्युत महावितरण समितीने येत्या चोवीस तासांमध्ये सर्व फिडर पूर्ववत केले नाही तर उद्या दि. २० सप्टेंबर रोजी दुपारी ठीक १:०० वा. वीज वितरण कंपनी कार्यालय पेरणे या कार्यालयाला सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने टाळा ठोकण्यात येणार आहे. असा इशारा पै. संदीप भोंडवे यांनी केला असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही भोंडवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.




