
✍️ शब्दांकन:- सौ. वैजयंता महेश गजरे
अध्यक्षा: १ अर्थ सोशल फाउंडेशन, पुणे.


१० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत साजरा होणाऱ्या दहा दिवसीय गणपती उत्सवाच्या सर्व भाविक भक्तांना खुप खुप शुभेच्छा.
गणपती उत्सव म्हटलं की, त्याच्या आधीच भाविक तयारीला लागतात. सर्व गृहिणी, लहान -थोर मंडळी मग गणपतीची मूर्ती बनवण्यापासून ते पूर्ण सजावट, प्रसाद वगैरे सगळं करेपर्यंत सगळ्यांची दमछाक होते. पण हेच दहा दिवसाचे जे वातावरण आहे ते खूप उल्हासित आणि आनंदित लहरींची निर्मिती करनारे ठरते. हे गणपती उत्सवाचे दहा दिवस कसे व किती पटकन जातात ते कोणालाच कळत नाही. गणपती उत्सव साजरा करण्या मागे लोकमान्य टिळकांचा उद्देश्य हा समाज एकत्रित व संघटीत व्हावा आणि नवीन पिढीला आपल्या संस्कृतीचे दर्शन व्हावे यासाठी सुरू केलेला हा सण आहे.
” एक गाव एक गणपती”
ही संकल्पना अंमलात आणली पण कालांतरानं प्रत्येकाला देव माझाच आहे म्हणून आपापल्या घरी स्थापना करण्याची सवय होऊ लागली. आता गणपती घरोघरी स्थापन झाले पण याचा फायदा आणि तोटा अशा दोन्ही गोष्टी आहेत. तर आता आपण बघूया ही गणपतीची घरोघरी स्थापना करत असताना होणारे तोटे-
१) गणपती घरी स्थापन करण्यासाठी प्रत्येकाला घरी मूर्तीची आवश्यकता भासू लागली, मूर्ती बनवण्याचे प्रमाण वेगाने वाढलं. याच्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू माती याचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही गणपती विसर्जन करणार आहात त्या जलाशयात गाळ साठून तो जलाशय नष्ट होण्याच्या मार्गावर येऊ लागले आहेत. नद्या, नाले, विहिरी व समुद्र यांच्या प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढले.
२) गणपती सजावटी मध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू मुख्यत्वे प्लास्टिक, थर्माकोल यांच्या बनू लागल्या आणि या वस्तू विघटनशील नसल्याकारणाने हा कचरा निसर्गात वर्षानुवर्षे जास्त प्रमाणात साठवणूक होऊ लागला.
३) विसर्जनाने नद्यांचं प्रदूषण मुख्यत्वेकरून जास्त प्रमाणात होऊ लागले. त्याच्यामुळे जैविक जे जलवनस्पती व जलद वर्गीय प्राणी आहेत त्यांना हानी पोहोचू लागली.
उत्सव आपण साजरे करावेत यांनी आनंदाची निर्मिती होते, समाजिक वातावरण चांगले राहते. पण यामधून निसर्गाला हानी पोचणार नाही याची जर सर्व भाविक भक्तांनी काळजी घेतली तर हे उत्सव निसर्गा प्रमाणेच मनुष्यालाही चांगल्याप्रकारे आनंद देऊ शकतात.
त्यासाठीच जैविक विघटन होणाऱ्या नैसर्गिक गोष्टींचा जास्तीत जास्त सजावटीसाठी वापर करण्यात यावा ही मी एक जागृत निसर्गप्रेमी म्हणून सर्व भाविक भक्तांना कळकळीची विनंती करते आहे. आपला निसर्ग आणि त्याचं संवर्धन ही आपली जबाबदारी आहे कारण निसर्गाचा समतोल राखला नाही तर अवकाळी पाऊस, दुष्काळ, प्लास्टिक प्रदूषण, रोगराई या सर्व गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे.
सण साजरे करताना निसर्गाची काळजी घ्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करा आणि सणांचा आनंद घ्या. धन्यवाद



