बारामती ॲग्रोचा ३१०० प्रती मे. टन प्रमाणे ऊस दर जाहीर; शेतकऱ्यांमध्ये समाधान

प्रतिनिधी l संजय साखरे (माय मराठी न्यूज)


शेटफळगडे (ता. इंदापूर) येथील बारामती ॲग्रो साखर कारखान्याने सन २०२५ – २६ च्या गाळप हंगामासाठी ऊस दराचा पहिला हप्ता जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. कारखान्याने पहिला हप्ता ३१०० रुपये प्रति मेट्रिक टन जाहीर केला असून ही घोषणा कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांनी केली आहे.
कात्रज (ता. करमाळा) येथे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या विकास निधीतून विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा मा.आ. संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे उपस्थित होते. याच कार्यक्रमादरम्यान त्यांनी ऊस दराची अधिकृत घोषणा केली.
बारामती ॲग्रो साखर कारखान्याने आजअखेर १० लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. करमाळा तालुक्यात कारखान्याची सात विभागीय कार्यालये कार्यरत असून या गटांमधून मोठ्या प्रमाणावर ऊस पुरवठा करण्यात आला आहे. त्यामध्ये केतुर गटातून ७० हजार मेट्रिक टन, टाकळी गटातून १ लाख २० हजार मेट्रिक टन, करमाळा गटातून १ लाख मेट्रिक टन, चिकलठाण गटातून ६० हजार मेट्रिक टन, उमरड गटातून ४० हजार मेट्रिक टन तसेच कंदर गटातून ४० हजार मेट्रिक टन ऊस पुरवठा करण्यात आला आहे.
बारामती ॲग्रो कारखान्याने करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर हातभार लावला असून शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरवठाही करण्यात आला आहे. या पुढील काळातही शेतकऱ्यांनी बारामती ॲग्रो साखर कारखान्यास ऊस पुरवठा करून सहकार्य करावे.
– सुभाष आबा गुळवे, उपाध्यक्ष, बारामती ॲग्रो.
बारामती ॲग्रो साखर कारखान्याने जाहीर केलेल्या ३१०० रुपयांच्या पहिल्या हप्त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.




