‘स्वराज्य मर्दानी खेळ’ संस्थेच्या वतीने आयोजित आगळा वेगळा रक्षाबंधन उत्साहात साजरा
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील शिवस्फुर्ती स्वराज्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेचे वतीने रक्षा बंधन हा सण आगळ्या-वेगळ्या व अनोख्या पद्धतीने शस्त्राचे पुजन करून आणि त्या शस्त्रांना राख्या बांधून साजरा करण्यात आला.
यामध्ये लाठी, तलवार, दंड, पटावर गंडा, चक्री या शस्त्रांना स्वराज्य मर्दानी खेळाच्या रणरागिणी कु. सिध्दि तळेकर, सानिका मोरे, अमृता काळे, प्रिंयका चेंडगे, सोनू चेंडगे यांनी शस्त्राचे पुजन करून त्यांना राख्या बांधल्या.
यावेळी शिवस्फूर्ती स्वराज्य मर्दानी खेळाचे प्रशिक्षक अक्षय तळेकर म्हणाले की, या वर्षी आमच्या संस्थेचे वतीने अनोख्या पद्धतीने हा सण साजरा केला आहे. रक्षा बंधनाच्या सणाला बहिण आपल्या भावाला राखी बांधते व बांधलेल्या धाग्याचे रक्षण आपला भाऊ करतो. तसेच हे शस्त्र देखील आपल्या स्वरक्षाणासाठी आहेत. आपल्या वर कधी अतिप्रसंग ओढवला तर ते शस्त्र, आपली सदैव साथ देणारे आहेत. म्हणूनच या शस्त्राची पुजन करून याला राख्या बांधण्यात आल्या. या अनोख्या व आगळ्या वेगळ्या रक्षाबंधनाची केम परिसरात खुप चर्चा होत आहे.



