-->
करमाळामाहिती विषयकविशेष

चिमुकल्या जान्हवी ला बाबासाहेब, शिवाजीराजे समजले आम्हाला कधी समजणार..?

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

✒️ ॲड. अजित सर्जेराव विघ्ने

उपाध्यक्ष- करमाळा बार असोसिएशन

 

 

दि. १४ एप्रिल रोजी करमाळा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच भगवान महावीर जयंती निमित्त असलेल्या भव्यदिव्य कार्यक्रमात हजारोंच्या जनसमुदाया समोर कु. जान्हवी सावंत या चिमुकली ने जबरदस्त भाषण केले. जान्हवी ही माझे मित्र पंचायत समितीचे सदस्य ॲड. राहुल सावंत यांची कन्या आहे. तिचे भाषण इतके जोषपूर्ण, अप्रतिम आणि अभ्यासपुर्ण होते की, ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. तिच्या भाषणाला अनेकांच्या कमेंट्स आल्या. ती प्रचंड ताकदीने आणि जोशपूर्ण बोलत होती. कारण, तीला महापुरुष बाबासाहेब समजले आहेत.

 

 

जान्हवी ने यापुर्वी शिवजंयती निमित्त ही असेच भाषण केले होते. आणि त्यावेळी सुद्धा वाहवा मिळवली होती. आज आपण जे चालतोय, बोलतोय ते या महापुरुषांच्या प्रचंड संघर्ष आणि मेहनतीने पण आजही आपण जाती भेदाच्या प्रक्रीयेत गुंतलोय, प्रत्येकाने आपले झेंड्याचे रंग ठरले आहेत. प्रत्येक जातीच्या आणि धर्माच्या लोकांनी महापुरुषांना वाटुन घेतले आहे. मराठ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज, धनगरांची अहिल्यादेवी, बौद्धांचे आंबेडकर, माळी समाजाचे ज्योतिबा, परिट समाजाचे गाडगेबाबा, हिंदु साठी राम, जैनांसाठी महावीर आणि बरेच काही हे विदारक चित्र आहे. याचाच गैरफायदा साहजिकच राजकारणी लोक वेगवेगळ्या मार्गानी घेत आहेत. जाती धर्मांच्या नावाखाली माणसा माणसात फुट पाडायची आणि आपली पोळी भाजुन खायची अशी संस्कृती जोर धरतेय.

 

 

मी हे लिहीतोय कारण आज जान्हवी च्या व्हायरल भाषणानंतर माझ्याकडे अनेक मित्रांचे फोन आले, चर्चा झाली. अरे पोरगी लयंच भारी बोलली, राहुल सावंत बॅकवर्ड चे का? अरे मी तर या प्रश्नामुळे खरचं खुप संतापलो. किती बेकार माणसीकतेत अजुनही लोक जगत आहेत हे वास्तव आहे. महापुरुषांच्या होणाऱ्या प्रत्येक जयंतीच्या कार्यक्रमात ही चिमुकली जान्हवी धाडसाने बोलतेय, आपले विचार मांडतेय, मग मला प्रश्न पडतोय की शिवजयंतीत भाषण करणारे मराठ्यांचे, आंबेडकर जयंतीला भाषण करणारे हरिजनाचे, गाडगेबाबाचे जयंती ला भाषण केले की परिट समाजाचे आणि अहिल्यादेवी होळकरांचे गुणगान गायले की धनगर असे का ?? खरं तर अशी मानसिकता बाळगणाऱ्यांनीच आपले महापुरुष वाटुन घेतले आहेत. झेंडे वेगवेगळे करून विचारसरणी वेगवेगळी केली आहे. समाजात जे चाललयं ते चित्र विदारक आहे हे मात्र नक्की.

 

 

प्रत्येकाला आपल्या जाती आणि धर्माचा अभिमान असतो आणि ठेवावा यात गैर नाही, परंतु या महापुरुषांच्या जयंती निमित्ताने आपण सर्वांनी एकत्रित आले पाहीजे. महापुरुषांचे विचार समाजाला दिशा देण्याचे काम करतात ते विचार आत्मसात केले पाहीजेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची राज्यघटना लिहीली. त्यांचे एवढेच सिमित कार्य नव्हते. यासाठी त्यांनी केलेला संघर्ष महत्वाचा आहे. प्रत्येक समाजाला बरोबर घेऊनच त्यांनी हे कार्य केले आहे हे सुद्धा आत्मसात केले पाहीजे. आंबेडकरांच्या शिक्षणासाठी राजर्षी शाहु महाराजांनी मदत दिली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे शिलेदार हे आठरापगड जाती धर्माचे होते. मग जान्हवी चे भाषण निळा गमजा घालुन झाले की तीचा समाज कोणता? विचारणारे लोक किती चुकीच्या मानसिकतेत जगतात त्याची किव वाटते. म्हणुन अशा मानसिकतेत जगणाऱ्यांना दुरुस्त व्हावे लागेल. माझे अनेक मित्र छत्रपती शिवाजी महाराजांविषयी खुप छान लिहीतात आणि बोलतात. तर काही मित्र आंबेडकरांवर लिहीतात व बोलतात. मग त्यांच्याविषयी देखिल असेच विचार करणारे काही लोक आहेत. त्यांना आपला देव, देश, धर्म समजलाच नाही असेच म्हणावे लागेल. म्हणुनच जान्हवीला जे समजले ते आम्हाला कधी समजणार हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.?

 

मला वाटतं क्षुद्र विचारांच्या लोकांची गर्दी होण्याआधी तुम्हा आम्हाला संघटीत व्हावे लागेल. काही लोक समाजात वेगवेगळ चित्र निर्माण करून तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. काही लोकांनी आपआपल्या परिने देव आणि महापुरुष वाटुन घेतले आहेत. जयंती, पुण्यतिथी आली की तेवढ्या पुरते झेंडे, गंध, फेटे घालुन ते साजरे करण्यात काहीच अर्थ नाही. प्रत्येकाने आपली जात, धर्म विसरून अशावेळी मिळुन मिसळून कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. महापुरुषांच्या विचारांची परंपरा टिकविण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाचीच आहे. दरवर्षी जयंती, पुण्यतिथी साजरी करणारे काही लोक ॲट्रॉसिटी चा गैरवापर कित्येकदा करताना दिसतात. जयंतीच्या निमित्ताने जमलेल्या जनसमुदायाचा चुकीचा वापर अशावेळी करतात याची खंत वाटते. त्यामुळे वेळीच आपण सावध होऊन, समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करावे लागेल. एकता, समता, बंधुता, समानता या गोष्टी आपल्या समाजाला प्रेरक आहेत. आपण अजुनही वेगवेगळ्या आरक्षणासाठी आंदोलने उभारत आहोत, प्रत्येक समाजाचे वेगवेगळे मोर्चे काढत आहोत. दरवर्षी वेगवेगळ्या मागण्या मांडुन वेगवेगळे संरक्षण मागत आहोत. मग राजकारणी मंडळी याचाच गैरफायदा घेत आहेत. डिव्हाइड रॅन्ड रुल या वापर करून आपली दुकानदारी चालविण्यासाठी समाजाला वेगळी दिशा देण्याचे काम करत आहेत. कोणाचा निळा, कोणाचा भगवा, कोणाचा हिरवा, कोणाचा पिवळा असे रंग लावुन प्रत्येकजण वेगळ्याच विश्वात वावरत आहे. रंगावरून जात, धर्म ठरवले जाण्या इतपत आपण क्षुद्र असु नये. जान्हवी मराठा समाजाची आहे म्हणुन तिने फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचीच जयंती करायची किंवा कोणी हरिजन आहेत म्हणुन आंबेडकरांचीच जयंती साजरी करायची ही मानसिकता चुकीची आहे. अजुनही काही लोक चुकीचे विचार मांडत आहेत. त्यांना बहुदा आंबेडकर, शिवाजीराजे कळालेच नाहीत. त्यामुळेच जे जान्हवीला समजले आहे ते तुम्हा आम्हाला कधी समजणार? हा प्रश्न आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close