
माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)


करमाळा तालुक्यातील जलसंधारणाच्या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला असून काम न करता बिल उचलण्याचे प्रकार उघड झाले असून या प्रकरणातील संबंधित अधिकारी व शिवनेरी कंट्रक्शन कंपनीची चौकशी करावी. अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेली तीन वर्षापासून करमाळा तालुक्यात कोट्यावधी रुपयाची जलसंधारणाची कामे सुरू आहेत. काम कोण करते त्याचा तपास जनतेला लागत नाही. कामाच्या ठिकाणी ठेकेदाराचे नाव, कामाचे अंदाजपत्रक व कामाचे स्वरूप इतर माहिती लावली जात नाही. जलसंधारण खात्याचे अधिकारी केवळ शिवनेरी कंट्रक्शन कंपनीलाच ही कामे देऊन भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत.
करमाळा तालुक्यातील पोथरे, जातेगाव, नेरले या तलाव दुरुस्तीच्या कामात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. संबंधित कामाबद्दल तक्रार करणाऱ्याला आर्थिक तोड पाणी करून त्याचे तोंड गप्प केले जात आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता उडवा उडवीची उत्तरे दिले जातात. आज केवळ करमाळा तालुक्यात जलसंधारणाची ३० ते ४० कोटी रुपयांची कामे सुरू असून ठराविक ठेकेदार व अधिकारी यांची संगनमतामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे.
तलावातील पाण्याचा साठा वर्षभर कायमस्वरूपी राहून शेतकऱ्याचा फायदा व्हावा या हेतूने तलाव मजबुती करण्याचे काम शासन करते. मात्र हे तलाव मजबुतीकरण करण्याचे काम म्हणजे ठेकेदारांना फुकटचे घबाड मिळण्याचे ठिकाण झाले आहे. तलावातून काढलेला मुरूम सुद्धा रस्त्याच्या कामाला देऊन शासनाची रॉयल्टी चुकवून संबंधित ठेकेदार कोट्यावधी रुपये मिळवत आहेत.
शिवनेरी कंट्रक्शन कंपनी जलसंधारणाची कामे करण्यासाठी अपात्र आहे. त्यांच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे नाहीत. तरीसुद्धा याच एजन्सीला काम देण्याचा घाट अधिकारी का घालतात? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
मा. श्री. महेश चिवटे, शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख




