
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


साखर कारखानदारी चालवण्याचा आपला अनुभव जुना असून या क्षेत्रातील आव्हानावर मात करून सभासदांनी आदिनाथची सत्ता ताब्यात दिल्यास श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना सक्षमपणे चालू असा विश्वास माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केला. ते आज दुपारी करमाळा येथील विठ्ठल निवास या ठिकाणी करमाळा तालुक्याची एकेकाळची कामधेनु असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकी संदर्भात आयोजित विचारविनिमय बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या साखर कारखानदारी पुढे अनेक आव्हाने असून त्याचा सामना कारखान्यांना करावा लागत आहे. असे असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडून निधीची हमी घेऊन आपण आदिनाथ कारखान्यास गतवैभव मिळवून देऊ असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. माझी जन्मभूमी ही निमगाव असली तरी कर्मभूमी ही यापुढेही करमाळा तालुकाच राहील. माढा तालुक्यातील ३६ गावे तुटली तरी करमाळा हीच कर्मभूमी म्हणून काम करू, त्यामुळे विरोधकांनी माझ्या राजकीय भवितव्याची चिंता करू नये असेही ते म्हणाले.
दरम्यान विधानसभा निवडणुकीत करमाळा तालुक्यातील जनतेने मला दुसऱ्या क्रमांकाचे मतदान करून आपल्यावर विश्वास दाखवला याबद्दल त्यांनी करमाळा तालुक्यातील ⁸जनतेचे आभार मानले. येथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी मा.आ. शिंदे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास टाकत त्यांच्या धोरणानुसार आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भातील आगामी वाटचाल असेल असे सांगितले.
यावेळी सुहास गलांडे सर, वामनदादा बदे, तात्यासाहेब मस्कर, विवेकराव येवले, पोपटराव सरडे, चंद्रकांत सरडे, राजेंद्र बारकुंड, सुजित तात्या बागल आणि अजित विघ्ने यांची भाषणे झाली. या विचारविनिमय बैठकीसाठी करमाळा तालुक्यातील संजयमामा समर्थक मोठ्या संख्येने हजर होते.




