करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील जेऊर चिखलठाण केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांच्या शिक्षकांची शिक्षण परिषद दि.१७/०७/२०२१ रोजी दुपारी बारा ते चार या वेळेत ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली.
यावेळी शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुगावचे आदर्श, उपक्रमशील शिक्षक श्री. नवनाथ मारकड सर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी सेवानिवृत्त- विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांना शब्दरूपी निरोप देऊन भावी आयुष्यासाठी दोन्ही केंद्रातर्फे शुभेच्छा दिल्या आणि सर्वांचे शब्द सुमनाने स्वागत केले. तसेच दहावीच्या परीक्षेमध्ये १०० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे व संबंधित शिक्षकांचे अभिनंदन केले. जेऊर चिखलठाण केंद्रातील सर्व गुणवंत, किर्तीवंत व यशवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे कौतुक केले. अशाप्रकारे श्री. मारकड सर यांनी शिक्षण परिषदेची सुरुवात सुंदर व समर्पक शब्दात केली.
सेतू अभ्यासक्रम शाळेमध्ये राबवत असताना तो प्रभावीपणे कसा राबविता येईल हे अनेक उदाहरणे देऊन स्वतः करत असलेले प्रयत्न आणि हे राबविताना येणाऱ्या अडचणींवर कसा मार्ग काढता येईल याविषयी सविस्तर आणि सुंदर मार्गदर्शन चिखलठाण नं. २ येथील उपक्रमशील शिक्षक श्री. पाथ्रुडकर सर यांनी केले.
शाळा स्तरावर ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अध्यापन प्रभावीपणे कसे राबवता येईल याविषयी साळुंखे सरांनी मार्गदर्शन केले. आपल्या शाळेत ऑनलाइन शिक्षण कसे राबवले आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा झाला याची सविस्तर माहिती त्यांनी मांडली. त्यांची विद्यार्थिनी कु. शिवानी गुटाळ हिने ऑनलाइन शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी कसे वरदान ठरले याविषयी आपल्या अतिशय ओघवत्या वाणीतुन विचार मांडून सर्वांना चकित केले. सदर विद्यार्थिनी, शिक्षक व दिगंबररावजी बागल विद्यालयाचे कौतुक करमाळा तालुका शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी मा. श्री. बाबुरावजी जाधव साहेब यांनी केले.
‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ या विषयावर श्री. नितीन व्हटकर सरांनी मार्गदर्शन केले. हा उपक्रम राबवताना शाळेचे अंतरंग व बाह्यरंग आकर्षक करणे अपेक्षित आहे. शाळेचा परिसर स्वच्छ ठेवून शाळेच्या परिसरामध्ये फुलझाडे, फळझाडे व कुंड्या यांचा वापर करून शाळेचे सौंदर्य वाढविणे तसेच शाळेचा परिसर कसा आकर्षित करता येईल या विषयी माहिती दिली.
शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येते याविषयी सुंदर मार्गदर्शन श्री. कुलकर्णी सर यांनी केले. शाळा व्यवस्थापन समितीचा शालेय विकासामध्ये कसा वापर करून घेता येतो. हे त्यांनी स्वतः सदर समितीकडून करून घेत असलेल्या कामाचा आढावा सांगितला.
करमाळा तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी श्री. बाबुरावजी जाधव साहेब यांनी या शिक्षण परिषदेला पूर्ण वेळ उपस्थिती दर्शवून शिक्षकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. तळमळीने काम करणाऱ्या शिक्षकांचे विशेष कौतुक केले. तसेच खाजगी शाळांविषयी आढावा घेऊन त्यांनी १००% पटनोंदणी, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, ऑनलाइन ऑफलाइन अध्यापन याविषयी माहिती सांगून मार्गदर्शन केले.
जेऊर बीटचे विस्ताराधिकारी व जेऊर चिखलठाण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. भारत पांडव साहेब यांनी मार्गदर्शन पर बोलताना विविध प्रशासकीय बाबींवर प्रकाश टाकला. त्यांनी शालेय पोषण आहार, विद्यार्थी बँक खाती, शाळा व्यवस्थापन समिती बैठका, स्वच्छ शाळा सुंदर शाळा, पालक भेटी, गृहभेटी, शालेय रेकॉर्ड, वेळेचे बंधन आदि महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले.
शेवटी श्री. पाखरे सरांनी शिक्षण परिषदेचा थोडक्यात आढावा घेऊन सर्वांचे आभार मानले. तर सदर शिक्षण परिषदेचे ऑनलाईन आयोजन श्री. रविंद्र आगलावे सरांनी केले होते.




