
करमाळा/प्रतिनिधी


करमाळा तालुक्यात रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली गावोगावी कामे सुरू असून ही सर्व कामे संबंधित ठेकेदार व अधिकारी भागीदारीत करत असून यातून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. रस्त्याची दुरुस्ती मात्र कागदोपत्री दाखवली जात आहे. यामुळे गेली तीन वर्षात रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली खर्च केलेला निधी व संबंधित कामाची पाहणी बाळासाहेबांची शिवसेना करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांचा भांडाफोड करणार असल्याची माहिती बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.
आज बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी तालुकाप्रमुख देवानंद बागल, शहर प्रमुख संजय शीलवंत, युवा सेना प्रमुख निखिल चांदगुडे, उपशहर प्रमुख नागेश गुरव, राजेंद्र काळे, तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, गायकवाड, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, कोळगाव शाखाप्रमुख नागेश शेंडगे, रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी करमाळा रायगाव रस्ता दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी संपूर्णतः कामे बोगस असल्याची दिसून आले.
करमाळा तालुक्यातील रस्ता दुरुस्तीचे कामासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र हा निधी वाटून खाण्यासाठी एक टोळी बांधकाम खात्यात कार्यरत आहे. केवळ कागदोपत्री रस्ते दुरुस्ती दाखवून पैसे उचलल्या जातात. तेरी भी चूप मेरी भी चुप असा सर्व मामला असल्यामुळे सत्य बाहेर येत नाही. करमाळा रायगाव रस्ता दुरुस्तीची पाहणी केली असता डांबर खडीचा अवशेष आढळून आला नाही. शिवाय साईड पट्टीच्या कडेची सर्व झाडे काढण्याचे टेंडर असताना कुठेही झाडे न काढता केवळ एक जेसीबीने तास दोन तास काम करून कामाचा देखावा केला जात असल्याचा सर्व प्रकार निदर्शनास आला. यामुळे गेली तीन वर्षात झालेल्या सर्व रस्ता दुरुस्तीच्या कामाचे ऑडिट करण्याची मागणी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
रस्ते दुरुस्तीच्या कामासंदर्भात तक्रार असल्या तर त्याचे निवारण केले जाईल. इस्टिमेट, अंदाजपत्रक प्रमाणे काम केली नसल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
श्री. उबाळे साहेब, अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, करमाळा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी रस्ते दुरुस्तीचे कामाला विशेष लक्ष दिले आहे. रस्ता दुरुस्त नसल्यामुळे अनेकांचा अपघात होऊन जीव गमवावे लागतात. मात्र निधी येऊन सुद्धा काम होत नसल्यामुळे नाराजी होत आहे. याची दखल लोकप्रतिनिधींनी सुद्धा घेणे गरजेचे आहे.




