जेउर प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये औरंगाबादचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कृष्णराव कराड यांचा केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी शपथविधी झाला. डॉक्टर भागवत कराड यांनी शपथ विधी घेताच करमाळा तालुक्यातील शेलगाव येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून व पेढे वाटून जोरदार जल्लोष करण्यात आला.
डॉक्टर भागवत कराड हे सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांचे नेते असून ते दोन वेळा औरंगाबाद महानगर पालिकेचे महापौर होते. तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष होते. या काळामध्ये डॉक्टर कराड यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच कामाचा दाखला देत भारतीय जनता पार्टी ने डॉक्टर भागवत कराड यांना राज्यसभेवर खासदार केले. खासदार झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या कामाचा झंझावात कायम ठेवला मग ते ओबीसी आरक्षण असो किंवा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असो या प्रत्येक मुद्द्यावर डॉक्टर कराड यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली. तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. या सगळ्या कामाचा धडाका पाहता पक्षश्रेष्ठींनी डॉक्टर भागवत कराड यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला आहे. येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर भागवत कराड हे त्यांच्या कामाचा धडाका असाच चालू ठेवून भारतीय जनता पार्टीच्या पक्षवाढीसाठी तसेच देशाच्या जनतेच्या हितासाठी निर्णायक भूमिका पार पडणार आहेत. डॉक्टर भागवत कराड हे फक्त वंजारी समाजाचे नेते नसून ते सर्व समाज यांना एकत्रित घेऊन काम करणारे नेतृत्व आहेत. असे मत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस व प्रधानमंत्री पिक विमा तक्रार निवारण समिती सदस्य लक्ष्मण केकान यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज काळे पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर साळुंके, शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष गोविंद ठोंबरे, माजी ग्रामपंचायत सदस्य महादेव केकान व ग्रामस्थ उपस्थित होते.




