करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


भारतीय स्टेट बँक जेऊर शाखेमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ होत असून गेली चार महिन्यांपासून शेतकऱ्यांना शेती विषयक कर्ज पुरवठा करण्याकरिता संबंधित टेबलवर अधिकारी नाही. यामुळे जेऊर तसेच जेऊर परिसरातील दत्तक असलेल्या गावातील शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत बँकेने त्वरित शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप तसेच शेती विषयक सर्व सुविधा बाबत जागरूकता दाखवावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण केकान यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, कर्ज पुरवठा करण्याकरिता संबंधित विभागात अधिकारी नसल्यामुळे आम्ही तुम्हाला पिक कर्ज देऊ शकत नाही अशी उत्तरे गेली तीन ते चार महिन्यापासून शेतकऱ्यांना बँकेतील कर्मचाऱ्यांकडून ऐकावयास मिळत आहेत.
जेऊर व जेऊर परिसरातील अनेक गावे स्टेट बँकेकडे दत्तक असल्यामुळे या दत्तक गावांतील शेतकऱ्यांना इतर बँका पिक कर्ज तसेच शेती विषयक कोणत्याही सुविधा देत नाहीत. त्यामुळे सध्या तातडीने भारतीय स्टेट बँकेच्या जेऊर शाखेतील शेतकऱ्यांची पिक कर्जाची गरज लक्षात घेता तातडीने पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणूक करावी. अनेक शेतकऱ्यांना हप्ते भरण्याकरिता संबंधित टेबलला अधिकारी नसल्यामुळे विनाकारण व्याज भरावे लागत आहे असे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. याबाबत जागरूकतेने लक्ष देऊन आतातरी संबंधित अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी केकान यांनी केली आहे.
सदरचे निवेदन करमाळा तहसीलचे नायब तहसीलदार विजय जाधव यांना देण्यात आले असून यावेळी करमाळा भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, सोलापूर जिल्हा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दीपक चव्हाण, मकाई कारखान्याचे माजी संचालक अमोल पवार, भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, नरेंद्रसिंह ठाकूर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



