प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची परवड थांबवा अन्यथा आंदोलन करु- युवासेनेचा इशारा

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांची होत असलेली परवड थांबवा अन्यथा बोंबाबोंब आंदोलन केले जाईल. असा इशारा युवा सेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शंभूराजे फरतडे यांनी म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या शेकडो लाभार्थी शेतकऱ्यांना कागद पत्रातील चुकांमुळे लाभ मिळत नसुन अनेक शेतकरी महसूल व कृषी विभागाच्या कार्यालयात खेटे घालत आहेत. मात्र दोन्ही कार्यालयातील अधिकारी टोलवा टोलवी करत असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची परवड होत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तिन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार असे एकूण सहा हजार रूपये केंद्र सरकारकडून दिले जातात. यासाठी ई केवायसी बंधनकारक केली आहे. अनेक अशिक्षित शेतकर्यांची केवायसी करण्याची प्रकिया पुर्ण झालेली नाही तर काही शेतकऱ्यांची अनेक बॅंकेत खाती आहेत. ज्या बँकेतील खात्याला आधार क्रमांक दिलेला आहे त्या ठिकाणी पैसे जात आहेत. तर काही शेतकर्यांचे खाते क्रमांक चुकले असल्याने पैसे दुसर्या नावे जात आहेत. याची दुरुस्ती करण्यासाठी शेतकरी तहसील मध्ये जातात तेव्हा त्यांना कृषी कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, त्या ठिकाणी देखील त्यांची दखल घेतली जात नाही. बॅंकेत देखील शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही. सन्मान निधी चे पैसे जमा झाले आहेत का? असे विचारल्यानंतर एखाद्या भिकाऱ्याला बोलावे तसे बॅंक कर्मचारी शेतकऱ्यांनाच दटावत आहेत तसेच मोदींना जावुन विचारा असा अजब सल्ला देत आहेत.
तालूक्याच्या ग्रामीण भागातुन हे शेतकरी हेलपाटे मारत आहेत हा अंत्यत गंभीर प्रकार आहे. सरकार यांना वर्षाकाठी ६०००/- रू देऊन सन्मान करत असताना प्रशासन मात्र अवमान करत आहे. स्वतः तहसीलदार व कृषी आधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालून शेकडो शेतकर्यांचा हा प्रश्न सोडविण्यासाठी पूर्ण वेळ अधिकार्याची नेमणूक करून लाभार्थ्यांना वृत्तपत्रातुन माहिती द्यावी व आठ दिवसांच्या आत सर्व पात्र लाभार्थ्यांची ई केवायसी करून प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता सन्मानाने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी व्यवस्था करावी. अन्यथा युवासेनेच्या वतीने शेतकऱ्यांना घेऊन बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिला आहे.



