करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा शहरातील मराठा समाजाची करोडो रुपये किमतीची असलेली जमीन विकण्यापेक्षा त्याचा वापर मराठा समाजाच्या मुला मुलींचे शिक्षण व मराठा समाजाच्या हितासाठी व्हावा असे स्पष्ट मत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. ते करमाळा तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, करमाळ्यात मराठा समाजाची जमीन जागा आहे हे मला माहीत नव्हते, मात्र उपलब्ध माहितीनुसार या जागेचा गैरवापर करण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर ते योग्य नाही. समाजाच्या जागेचा वापर समाजाच्या हितासाठीच केला पाहिजे या मताचा मी आहे. त्या पद्धतीने मी काम करून लवकरच या सगळ्याचा मी आढावा घेणार आहे. मराठा आरक्षणा संदर्भात बोलताना ते म्हणाले की, राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण हातातून गेले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने ५८ मोर्चे निघाले. या मोर्चात राज्यातील सर्व पक्ष सहभागी झाले होते मात्र, सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते सहभागी होत नाहीत याचा अर्थ असा की महाविकास आघाडी सरकारच्या मनात काळेबेरे आहे.
यावेळी त्यांच्या समवेत भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माळशिरसचे भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील, करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहर प्रमुख रामा ढाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.




