करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा ते संगोबा हे रस्ता दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे याची स्पष्ट कबुली सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता उबाळे यांनी देऊन हे काम तात्काळ ठेकेदाराकडून दुरुस्त करून घेऊ असे आश्वासन दिल्यामुळे शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले आहे. करमाळा ते संगोबा रस्ता दुरुस्तीसाठी १ कोटी ८० लाख रुपयाचे काम सुरू असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या कामाची सखोल चौकशी करून कारवाई करावी. या मागणीसाठी शिवसेनेने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शेतकरी संघटनेचे नेते अण्णा सुपनर, धनगर उन्नती समाज मंडळाचे अध्यक्ष विनोद महानवर, प्रहार संघटनेचे अध्यक्ष शिंदे आदी पदाधिकाऱ्यांसह रस्त्यावर जाऊन पाहणी केली.

यावेळी रस्त्याचे काम सुरू असतानाच पडलेले खड्डे झालेले निकृष्ट काम पाहून बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी डोक्याला हात लावले. या रस्त्यावरील ९०० मीटर रस्त्यावर बीबीएम सुद्धा केले नाही ही बाब लक्षात आल्यानंतर उबाळे यांनी संबंधित ठेकेदाराला फोन करून जाब विचारला. यानंतर श्री उबाळे यांनी काम निकृष्ट झाल्याचे मान्य करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने येत्या १५ दिवसाच्या आत इस्टिमेट प्रमाणे अंदाज पत्रकाप्रमाणे ठेकेदाराकडून काम करून घेऊ शिवाय तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना दमदाटी व मारहाण करण्याची भाषा करणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांना सूचना देऊ आणि त्यांनी यापुढे असे कृत्य केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना दिले. बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी समक्ष निकृष्ट दर्जाच्या कामाचे कबुली देऊन हे काम दुरुस्त करण्याचे आश्वासन दिल्यामुळे रास्ता रोको आंदोलन मागे घेत असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की, करमाळा संगोबा रोडला विशेष महत्व असून तालुक्यातील जागृत देवस्थान आदिनाथ मंदिराला जाणारा हा रस्ता आहे. शिवाय या रस्त्यावरूनच मराठवाडा विभागाला वाहतूक केली जाते या कामाचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना गेली महिनाभर त्या भागातील शेतकरी तक्रार करत होते. मात्र संबंधित ठेकेदारांनी पाळलेले गुंड शेतकऱ्यांना दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी देत होते. यामुळे शिवसेनेनेही या प्रकरणात लक्ष घालून रास्ता रोको आंदोलनाचे नियोजन केले होते. बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे पंधरा दिवसात हा संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती नाही केली तर पुन्हा शिवसेना रस्ता रोको आंदोलन करीन असा इशारा शेवटी चिवटे यांनी दिला.



