वटपौर्णिमेनिमित्त मांगी येथे वडाची रोपे वाटप; सुजित तात्या बागल यांचा आदर्श उपक्रम
करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यात नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवणारे सामाजिक कार्यकर्ते सुजित (तात्या) बागल यांनी आज मांगी येथे महिलांसाठी पर्यावर्णपुरक असा आदर्श उपक्रम राबविला. आज वटपौर्णिमेनिमीत्त मांगी गावातील महिलांना प्रत्येकी एक वडाच्या रोपाचे वाटप करण्यात आले.
यावेळी मांगी येथील प्रेरणा महिला बचत गटाच्या महिलांनी विषेश सहभाग नोंदवला होता. यावेळी मांगी येथील प्रगती विद्यालयाच्या सौ. देवकर मॅडम, व नूतन ग्रामपंचायत सदस्या कुमारी स्नेहल अवचर यांनी महिलांना वटवृक्षाचे महत्व पटवून दिले. सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे वृक्ष म्हनून याला ओळखले जाते. तसेच त्याच्या पानांचे पण आयुर्वेदात खूप महत्व आहे. या वडाच्या रोपाचे प्रत्येक महिलेने वर्षभर संगोपन करायचे आणि एका वर्षानंतर म्हणजे पुढील वटपौर्णिमेला ज्या महिलांनी त्या रोपाचे संगोपन चांगल्या प्रकारे केले आहे अशा महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे, सुजित (तात्या) बागल यांनी सांगितले. हा आगळा वेगळा उपक्रम राबविल्याने मांगी गावातील पर्यावरण प्रेमी गायक प्रवीण अवचर यांनी सुजित तात्यांचे विषेश कौतुक केले. कोणतेही सामाजिक उपक्रम राबवताना पर्यावरण पूरक उपक्रम हि राबवले पाहिजेत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमा वेळी मांगी येथील बचत गटाच्या सौ. निर्मला कांबळे, सौ. नूतन बागल यांचेसह गावातील महिला उपस्थित होत्या. सर्व महिलांनी या रोपाचे चांगल्या प्रकारे संगोपन करून त्याचे वटवृक्षात रूपांतर करण्याचा निर्धार केला आहे. सदर कार्यक्रम हा कोरोना संकटाचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करून राबविण्यात आला.




