ढोकरी येथील ‘या’ शेतकऱ्याच्या केळीला उच्चांकी दर; आखाती देशात केली जाते निर्यात

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील मौजे ढोकरी येथील केळी उत्पादक शेतकरी महादेव ज्ञानदेव बंडगर यांनी आपल्या केळीला २९ रूपये ५० पैसे इतका राज्यातील उच्चांकी दर प्राप्त केला असून त्यांची केळी आखाती देशात इराण ला निर्यात होत आहे. राज्यातील या उच्चांकी दराची सर्वदूर चर्चा आहे.
उजनी धरणामुळे पुनर्वसीत ढोकरी ता. करमाळा येथील बंडगर वस्ती परिसरात गट नंबर ११० मध्ये करमाळा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा चे सभापती प्रा. शिवाजी बंडगर यांचे बंधू महादेव बंडगर यांनी पाच एकर क्षेत्रात केळीची लागवड केली असून त्यातील दोन एकरातील लागण (सुरू) कालपासून काढायला सुरू झाली. त्यातील पहिली गाडी इराण ला निर्यातीसाठी गेली आहे. याचा दर उच्चांकी २९ रूपये ५० पैसे प्रमाणे बंडगर यांना प्राप्त झाले.
वांगी परिसरात अगदी सुरुवातीला केळी उत्पादन करणार्या शेतकर्यामध्ये महादेव बंडगर त्यांची गणना होते. ते केळी पिकांचे संगोपण करताना लागणीचे टायमिंग, रोपे, लागवड पद्धत, खते, औषधे, पाणी, यांचं नीट नेटकं नियोजन करतात. त्यामुळे वांगी परिसरातील अनेक शेतकरी त्यांचा सल्ला घेतात.
करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील स्थानिक व्यापारी तुषार गुटाळ यांनी सार्थक अॅग्रो, केरळ या केळी खरेदी कंपनी ला ही केळी दिली आहे. तुषार गुटाळ, कंपनी चे संचालक सनी इंगळे व जी 5 या बेंगलोर येथील सह कंपनीचे शब्बीर केफी, मरफील मेरूफ यानी बंडगर यांच्या प्लाॅट ला समक्ष भेट दिली. यावेळी महादेव बंडगर, वांगी सोसायटीचे उपाध्यक्ष भैरवनाथ बंडगर यांनी त्यांचे स्वागत केले.
गेल्या दहा-बारा वर्षापासून आम्ही केळी या पिकाचे उत्पादन घेत आहे. परंतु, इतका मोठा दर प्रथमच मिळाला असल्याने खूप आनंद आहे. उच्चांकी दर मिळाल्यामुळे रात्री अपरात्री अनंत अडचणींना तोंड देत केलेल्या कष्टाचे फळ मिळाल्याचे समाधान तर वाटतेच पण आत्मविश्वास ही दुणावला आहे.
श्री.महादेव बंडगर, केळी उत्पादक शेतकरी, रा.ढोकरी, ता.करमाळा.




