कोल्हापूरनंतर आता सोलापुरात मराठा आरक्षणासाठी येत्या ४ जुलै रोजी उग्र मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा राज्यातील सर्वात मोठा मोर्चा असणार आहे. तर याच दिवशी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात रास्ता रोको आंदोलन ही करण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांची परवानगी नाही मिळाली तरी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.


या मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांना भेटून पत्रं देण्यात येणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं ही त्यांनी सांगितलं आहे. यामध्ये मराठा समाजाबरोबर शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कोल्हापूरनंतर आता सोलापुरात मराठा समाजाचा मोर्चा निघणार असल्यामुळे सर्वाच्याच नजरा या मोर्च्याकडे आहेत.

या मोर्चाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून होणार आहे. मोर्चाची मोर्चेबांधणी करण्यासाठी जिल्ह्याचा दौरा करणार आहे. मोर्चाचे नेतृत्व मराठा समाजाचे नेते, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील करणार आहेत. त्याचबरोबर या मोर्चासाठी सोलापुरातील लोकप्रतिनिधींसह छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे, खासदार नारायण राणे, शिवेंद्र राजे भोसले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी प्रमुख नेत्यांनाही आमंत्रित करण्यात येणार आहे.
मूक मोर्चा काढून काहीही होत नाही. त्यामुळे हा उग्र मोर्चा असणार आहे. कारण आक्रमक झालो तरच महाविकास आघाडी सरकार दखल घेईल, अन्यथा दखल घेतली जाणार नाही. मराठा समाज लढवय्या समाज असल्याने आता आक्रमक होण्याशिवाय पर्याय नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेला मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील, सोलापूर जिल्हा समन्वयक राम जाधव, किरण पवार, श्रीकांत घाडगे, सोमनाथ राऊत, प्रताप कांचन आदी नेते उपस्थित होते.




