माय मराठी न्युज प्रतिनिधी


आज पहील्याच दिवशी पावसाळी अधिवेशनाची सुरुवात आमदारांच्या गोंधळात सुरू झाली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. १२ महिन्यांसाठी या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले असून तसा ठरावही सभागृहात मंजूर करण्यात आला आहे. भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा ठराव मंजूर केल्यानंतर फडणवीस यांनी हा लोकशाहीचा अपमान आहे असे म्हणत सभागृहाच्या कामावर बहिष्कार घातला.
राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार कडून इम्पेरीकल डाटा उपलब्ध व्हावा असा ठराव मांडला आणि तो मंजूर केला. पण यावेळी भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. भुजबळांनी पुराव्यानिशी फडणवीसांच्या काळात झालेला पत्रव्यवहार सभागृहात वाचून दाखवला. त्यावर फडणवीस बोलण्यासाठी उभे राहिले, पण सभापती भास्कर जाधव यांनी त्यांना बोलू दिले नाही. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभापतींच्या व्यासपीठाला घेराव घातला.
या गोंधळात ओबीसी आरक्षणाबाबत चा ठराव मंजूर करण्यात आला. पण, भाजप आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर भास्कर जाधव दालनाकडे जात असताना भाजपच्या काही आमदारांनी त्यांना घेराव घातला. यावेळी भास्कर जाधव आणि संजय कुटे यांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल परब यांची बैठक झाली. सभागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या आमदारांचं झालं निलंबन
१) गिरिश महाजन
२) संजय कुटे
३) अभिमन्यु पवार
४) आशिष शेलार
५) पराग आळवणी
६) योगेश सागर
७) राम सातपुते
८) नारायण कुचे
९) अतुल भातखळकर
१०) बंटी भागडिया
११) हरिष पिंपळे
१२) जयकुमार रावल
सभापती भास्कर जाधवांसोबतच्या धक्काबुक्कीनंतर भाजपच्या वरील १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. त्यानंतर विरोधकांनी ही कामकाजावर बहिष्कार टाकला.




