-->
क्राईमराज्य

दुर्गा पूजेनंतर अंघोळीला गेलेल्या ३ तृतीयपंथींचा नदीत बुडून मृत्यू; मृतदेहांचा शोध सुरु

माय मराठी न्युज नेटवर्क

 

वसई पूर्व खानीवडे जवळील तानसा नदीच्या खाडीपात्रात गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास तीन तृतीयपंथीयांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. वसई-विरार महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाकडून त्या खाडीपात्रात त्या तिघांच्या मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेत तीन तृतीयपंथी थोडक्यात बचावले असून बुडालेल्या तीन जणांचा शोध सुरू आहे.

 

बुधवारी झालेल्या सर्वपित्री अमावास्या नंतर गुरुवार पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. घटस्थापनेच्या निमित्ताने दुर्गापूजा करण्यासाठी सहा तृतीयपंथी अंघोळीसाठी तानसा नदीत गेले होते. त्यापैकी तीन तृतीयपंथींचा बुडून मृत्यू झाला असून तीन जणांचा जीव थोडक्यात वाचला आहे. ही दुर्देवी घटना पारोळ खराटतारा येथे तानसा नदीवर घडली आहे. या ठिकाणी खानिवडे येथे टोलनाका असल्याने तृतीयपंथीयांचा जास्त वावर असतो.

 

नदीत अंघोळ करण्यासाठी सहा तृतीयपंथी गेले असता त्यापैकी तिघांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते खोल पाण्यात गेले आणि बुडून त्यांचा दुर्देवी अंत झाला. त्यांच्या साथीदारांनी ही माहिती विरार पोलिसांना दिली. विरार-वसई शहरातील महापालिकेच्या अग्निशमन दलांच्या जवानांनी त्यांचे मृतदेह शोधण्यासाठी नदीत शोधमोहीम सुरु केली आहे. तानसा नदीत या तिघांच्या मृतदेहांचा शोध अग्निशामक दलाच्या जवानांकडून व स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने बोटीद्वारे युद्ध पातळीवर घेतला जात आहे. यामध्ये अरिका (वय ४०), सुनीता (वय २७), प्राची (वय २३) असे या मयत झालेल्या तृतीयपंथींची नावे आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close